--
इंदापूर : गेली २५ वर्षे इंदापूर तालुक्यातील जनतेला खोटे बोलण्याचा धंदा विरोधकांनी केला व आताही ग्रामपंचायत निवडणुकीचे सरपंच ३८ आपल्या विचाराचे निवडून आले नसताना देखील, केवळ तीन सरपंचांचा सत्कार करून, इतर सरपंच न दाखवता विरोधक दिशाभूल करण्याचा प्रयत्न करतात. त्यामुळे विरोधकांचा खोटेपणा राष्ट्रवादी काँग्रेसने जाहीर मोडीत काढून ४१ सरपंच मोजून दाखवले आहेत, अशी टीका माजी मंत्री हर्षवर्धन पाटील यांचे नाव न घेता सार्वजनिक बांधकाम पशुसंवर्धन राज्यमंत्री दत्तात्रय भरणे यांनी केली.
इंदापूर तालुका राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने भरणेवाडी येथील राज्यमंत्री दत्तात्रय भरणे यांच्या निवासस्थानी, तालुक्यातील नवनिर्वाचित ४१ सरपंचांचा जाहीर सन्मान सोहळा आयोजित करण्यात आला होता. अध्यक्षस्थानी पुणे जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष प्रदीप गारटकर होते. यावेळी सार्वजनिक बांधकाम पशुसंवर्धन राज्यमंत्री दत्तात्रय भरणे बोलत होते. राज्यमंत्री दत्तात्रय भरणे त्यांच्या सुविद्य पत्नी सारिका भरणे, माजी जिल्हा परिषद सदस्य प्रतापराव पाटील, बाळासाहेब करगळ, कालिदास देवकर, राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुका कार्याध्यक्ष अतुल झगडे, तालुका अध्यक्ष हनुमंत कोकाटे, राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी तालुकाध्यक्ष महारुद्र पाटील, महिला आघाडीच्या तालुकाध्यक्षा छाया पडसळकर, युवक तालुकाध्यक्ष शुभम निंबाळकर, युवक राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्याध्यक्ष सचिन खामगळ, शहराध्यक्ष बाळासाहेब ढवळे उपस्थित होते.
भरणे म्हणाले की, राष्ट्रवादी काँग्रेसच्या विचाराच्या ४१ ग्रामपंचायती निवडून आल्या आहेत. या सर्व ग्रामपंचायतीने व विरोधी निवडून आलेल्या देखील इतर ग्रामपंचायतीने, आपल्या गावाच्या विकासाचा आराखडा अत्यंत हुशारीने निर्माण करावा. एकाही गावाला विकासकामासाठी निधी कमी पडू दिला जाणार नाही. दलित वस्तीतील रस्ते, वीज, पाणी गावातील अंतर्गत रस्ते, प्रत्येक घराला नळ कनेक्शन, वीज कनेक्शन देण्याची भूमिका घेतली जाईल. इंदापूर तालुक्यातील ग्रामपंचायतीला जलस्वराज्य योजनेतून निधी मिळवून देण्यासाठी, तब्बल ८८ कोटींचा आराखडा शासनाकडे सादर केला आहे. हा आराखडा मंजूर करून घेतला जाईल.
--
चौकट :
४१ सरपंचांची ओळख परेड
इंदापूर तालुक्यातील ६० ग्रामपंचायतीच्या पंचवार्षिक निवडणुका झाले आहेत यापैकी ४१ सरपंच राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे निवडून आलेले आहेत. सर्व ४१ सरपंच यांची ओळख परेड राज्यमंत्री दत्तात्रय भरणे यांनी गावाचे नाव घेत जनसमुदायासमोर ओळख परेड करून दाखवली. यामध्ये सपकळवाडी, पोंधवडी, लोणी देवकर, चिखली, निमगाव केतकी, निंबोडी, अंथूर्णे, रुई, बळपुडी, भांडगाव, हगारवाडी, काटी, कळस, तक्रारवाडी, लासुर्णे, शेटफळगडे, पिंपरी बुद्रुक, शहा निमसाखर, सणसर, गोतोंडी, सराफवाडी, चांडगाव, कळंब, पिंपळे, भरणेवाडी, चाकाटी, गिरवी, कडबनवाडी, पळसदेव, घोरपडवाडी, कचरवाडी, सरडेवाडी, कौठळी, जाचक वस्ती, जाधवाडी, दगडवाडी, पिठेवाडी, अकोले, तरंगवाडी या ग्रामपंचायतीच्या सरपंच यांचे उपस्थितांनी टाळ्यांच्या गजरात स्वागत केले.
--