पुणे : पुणेपोलिसांनी येत्या १ जानेवारी २०१९पासून अमलात आणल्या जाणाऱ्या हेल्मेट सक्तीच्या प्रभावी अंमलबजावणीची घोषणा केल्यावर पुण्यातील स्वयंसेवी संस्थांनी त्याला विरोध दर्शवायला सुरुवात केली आहे. याबाबत हेल्मेट विरोधी कृती समिती पुढे सरसावली असून येत्या मंगळवारी या विषयावर बैठक होणार असल्याचे समजते.दरम्यान पोलीस आयुक्त के वेंकटेशम यांना सत्य परिस्थिती सांगून, निवेदन देऊन हेल्मेटसक्ती मागे घेण्याची विनंती केली जाणार आहे मात्र तरीही सक्ती केली जाणार असेल तर आम्ही रस्त्यावर उतरू असा इशारा समितीतर्फे अंकुश काकडे यांनी दिला आहे.
पुढे ते म्हणाले की, नवीन पोलीस आयुक्त आले की हेल्मेट सक्ती लागू केली जाते. यापूर्वी चार ते पाचवेळा हा प्रयोग झाला आहे. मात्र दरवेळी पुणेकरांनी कडाडून विरोध केल्यावर सक्ती मागे घेण्यात आली आहे. शहरात असणारी वाहन संख्या, अरुंद रस्ते आणि वाहतुकीचा बोजवारा यांचा विचार केला तर ताशी ३० किलोमीटरपेक्षा अधिक वेगाने दुचाकी चालवणे अशक्य आहे. अशावेळी हेल्मेटची तितकीशी गरज नाही. याच विषयावर सजग नागरिक मंचाचे विवेक वेलणकर यांनीही मत मांडले आहे. ते म्हणाले की, शहरात असणाऱ्या वाहनांची संख्या बघता तेवढे आयएसआय मान्य असलेले हेल्मेट उपलब्ध होणे अशक्य आहे. त्यामुळे निकृष्ट प्रतीचे आणि जीव वाचवण्यासाठी निरुपयोगी तसेच फक्त पोलिसांना दाखवण्यापुरत्या हेल्मेटचा वापर वाढणार आहे. दुसरीकडे दारू पिऊन गाडी चालवणं, नो एंट्रीतून गाडी चालवणं अशा अ दर्जाच्या नियमबाह्य वर्तनावर कडक कारवाई न करता पोलीस हेल्मेटच्या मागे लागताना दिसत आहेत.
हेल्मेटला विरोध नाहीच !
एखादा दुचाकीस्वार स्वखुशीने हेल्मेट वापरत असेल तर त्याला आमची हरकत नाही. उलट राष्ट्रीय महामार्गावर हेल्मेट अतिशय गरजेचे आहे. मात्र पुणे शहरात हेल्मेटसक्ती करणे चुकीचे आहे असे स्पष्ट मत या दोघांनी व्यक्त केले.
शंभर टक्के पोलिसांनी हेल्मेट वापरावे
हेल्मेट वापरणे फक्त नागरिकांची जबाबदारी नसून समान कायदा असणाऱ्या पोलिसांचीही जबाबदारी आहे.त्यामुळे फक्त पुढे बसणाऱ्या नाही तर कायद्यात सांगितल्याप्रमाणे मागे बसलेल्या प्रत्येक पोलिसानेही तीन महिने हेल्मेट वापरून दाखवावे आणि मग नागरिकांना प्रबोधन करावे असे आव्हान वेलणकर यांनी दिले.