लोणावळा : शहरातील भूमिपुत्रांच्या रोजगारावर गदा आणत स्वत:चे पाय रोवू इच्छिणा-या ओला या प्रवासी वाहतूक करणा-या खासगी कंपनीला सर्वपक्षीय मंडळींनी कडाडून विरोध दर्शविला आहे. ही सेवा तत्काळ बंद न झाल्यास तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा सर्व राजकीय पक्षांचे शहराध्यक्ष व सर्व पक्षीय नगरसेवकांनी मंगळवारी बैठकीत दिला.लोणावळा हे पर्यटनाचे ठिकाण असल्याने येथील सुशिक्षित बेरोजगार युवकांनी प्रवासी वाहतूक करण्याकरिता चारचाकी वाहने घेतली आहेत. शहर व परिसरातील ३०० ते ३५० युवक या व्यवसायामध्ये आहेत. लोणावळा साईटसिर्इंग मुंबई, पुणे पिकअप-ड्रॉप तसेच देवदर्शन अशा प्रकारची प्रवासी वाहतूक करत हे तरुण त्यांचा प्रपंच चालवत आहेत.ओला ही मल्टीनॅशनल कंपनी असल्याने कमी दर आकारत पर्यटक व नागरिकांना आकर्षित करत असल्याने स्थानिक व्यावसायिक संकटात सापडले आहेत. ओला सेवा सुरू झाल्यास येथील ३००-३५० व्यावसायिकांवर उपासमारीची वेळ येणार असल्याने तातडीने ही सेवा बंद करण्यात यावी, अशी मागणी खंडाळा येथे लोणावळा खंडाळा चालक मालक प्रवासी संघटनेने बोलविलेल्या सर्वपक्षीय बैठकीत राजकीय पक्षांच्या शहराध्यक्षांनी केली. सनदशिर मार्गाने ही सेवा बंद न झाल्यास तीव्र विरोध करण्याचा इशारा देण्यात आला.नगराध्यक्षा सुरेखा जाधव, उपनगराध्यक्ष श्रीधर पुजारी, तळेगावचे उपनगराध्यक्ष सुनील शेळके, शिवसेनेचे जिल्हाप्रमुख मच्छिंद्र खराडे, काँग्रेसचे प्रांतिक सदस्य दत्तात्रय गवळी, शहराध्यक्ष नारायण आंबेकर, राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष राजू बोराटी, महिलाध्यक्षा मंजुश्रीताई वाघ, भाजपा शहराध्यक्ष बाबा शेट्टी, युवकाध्यक्ष मुकेश परमार, गणेश मावकर, उमेश तारे आदी उपस्थित होते.लोणावळ्यात व्यावसायिकांवर दबावकाही स्थानिक नागरिक व अधिकारी यांना हाताशी धरून ओला या खासगी प्रवासी सेवा पुरविणारी कंपनी लोणावळ्यात शिरकाव करण्याचा प्रयत्न करत आहे. पोलीस अधिकारी, आरटीओ अधिकारी यांना हाताशी धरत स्थानिक व्यावसायिकांवर दबाव आणत ओला सेवा लोणावळ्यात सुरू झाली होती. त्याला स्थानिक व्यावसायिकांनी विरोध केल्यानंतर सेवा बंद केल्याची घोषणा १५ दिवसांपूर्वी केली होती. मात्र पुन्हा कंपनीने दोन ठिकाणी कार्यालये थाटत व्यवसायाला सुरुवात केली आहे.पोलीस अधिकाºयांची बदली कराओला सेवा लोणावळ्यात सुरू करण्याकरिता लोणावळा शहर पोलीस ठाण्यातील दोन पोलीस अधिकारी सहभागी आहेत. त्यांच्या मध्यस्थीने व भागीदारीने ओला लोणावळ्यात शिरकाव करत आहे, असा गंभीर आरोप करत तळेगावचे उपनगराध्यक्ष सुनील शेळके यांनी पोलीस निरीक्षक चंद्रकांत जाधव व उपनिरीक्षक प्रकाश शितोळे यांची बदली करण्याची मागणी केली आहे. त्याकरिता पुणे पोलीस अधीक्षक सुवेझ हक व गृहमंत्री यांना भेटणार असल्याचे त्यांनी या सभेत सांगितले.
लोणावळ्यात ओलाचा विरोध, तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 20, 2017 4:36 AM