ज्येष्ठ आयुर्वेदतज्ज्ञ डॉ. सुहास परचुरे म्हणाले, ‘नवीन निर्णयानुसार काही मोजक्या शस्त्रक्रियांनाच परवानगी मिळाली आहे. आणखी शस्त्रक्र्रियांना परवानगी मिळायला हवी. गेल्या अनेक वर्षांपासून भारतात इंटिग्रेटेड सिस्टिम अस्तित्वात आहे. प्रत्येक मेडिकलच्या विद्यार्थ्याला दोन्ही पॅथी शिकवल्या गेल्या पाहिजेत. मी १९७३ साली पदवी संपादन केली, तेव्हा ‘बीएएम अँड एस’ असा इंटिग्रेटेड कोर्स अस्तित्वात होता. त्यामध्ये मॉडर्न मेडिसीनचे विषय अंतर्भूत होते. पुढे अभ्यासक्रमात बदल झाला. आता तो अभ्यासक्रम परत राबवला गेला पाहिजे. सुश्रुतसंहितेमध्ये अनेक शस्त्रक्रियांचा हजारो वर्षांपासून उल्लेख केला आहे.’
‘१९१३ मध्ये लोकमान्य टिळकांनी केसरीच्या अग्रलेखामध्ये ‘इंटिग्रेटेड सिस्टिम’चा पुरस्कार केला होता. १९९२ साली महाराष्ट्राच्या आरोग्य मंत्री पुष्पाताई हिरे होत्या. सुषमा स्वराज केंद्राच्या आरोग्य मंत्री होत्या. मी ३४ वर्षे सिनेटचा सदस्य होतो. त्या वेळी ‘इंटिग्रेटेड सिस्टिम’ संदर्भात भेटून चर्चा केली होती. प्रत्येक राज्याला आपापली सिस्टिम ठरवण्याचा अधिकार आहे, असे स्वराज यांनी सांगितले. त्यानंतर मी पुष्पाताई हिरे यांना भेटलो. त्यानंतर महाराष्ट्रामध्ये या सिस्टिमला परवानगी देण्याचा पहिला शासन निर्णय जारी केला. १९९९ साली त्यामध्ये आणखी सुधारणा करण्यात आली. त्यानंतर उत्तर प्रदेश, पंजाब या राज्यांनाही ही परवानगी लागू केली’, अशी आठवणही डॉ. परचुरे यांनी सांगितली.
------------------------
बीएम अँड एस या पदवीचे बीएएमएस असे नामकरण झाले असले, तरी इंटिग्रेटेड कोर्स आजही शिकवला जातो. ह्रदय आणि मेंदू वगळता सर्व प्रकारच्या शस्त्रक्रियांचे प्रत्यक्ष प्रशिक्षण विद्यार्थ्यांना दिले जाते. आयएमएतर्फे केवळ विरोधाला विरोध केला जात आहे. याला पोटशूळ म्हणावे लागेल. चांगले शिक्षण देणा-या महाविद्यालयात उत्तम वैद्यकीय शिक्षण दिले जात असेल तर हरकत घेण्याचे कारण नाही. रुग्णाचे हित हेच प्रत्येक डॉक्टरचे उद्दिष्ट असले पाहिजे.
- डॉ. विनया दीक्षित, आयुर्वेदतज्ज्ञ