बारामती : विरोधी पक्षनेते अजित पवार यांच्या वक्तव्यामुळे तमाम शंभूभक्तांच्या भावना दुखावल्या आहेत. संभाजी महाराज हे स्वराज्यरक्षक होतेच .परंतु ते धर्मवीरही होते. याचे अनेक दाखले उपलब्ध आहेत. संभाजी महाराज यांनी स्वत: हिंदू धर्म सोडावा, यासाठी औरगजेबाने जंग जंग पछाडले. मात्र, महाराजांनी जीवाची पर्वा न करता बलिदान दिले. परंतु धर्म बदलला नाही. राजकारण्यांनी याचा विचार करावा, असा टोला भाजपचे जिल्हाध्यक्ष गणेश भेगडे यांनी लगावला.
नागपूर येथे नुकत्याच पार पडलेल्या अधिवेशनाच्या दरम्यान विरोधी पक्ष नेते अजित पवार यांनी छत्रपती संभाजी महाराज यांचा धर्मवीर नव्हे, तर स्वराज्य रक्षक असा उल्लेख केला. त्यामुळे पवार यांचा निषेध करण्यासाठी भाजपने सहयोग सोसायटी नंतर भिगवण चौकात नगरपरिषदेसमोर आंदोलन केले. यावेळी भाजपचे जिल्हाध्यक्ष गणेश भेगडे, पुण्याचे महापौर मुरलीधर मोहोळ, जालिंदर कामठे, बाळासाहेब गावडे, दिलीप खैरे, गजानन वाकसे, रंजनकुमार तावरे, सुरेंद्र जेवरे, पांडूरंग कचरे, अविनाश मोटे, सतीश फाळके आदींनी या आंदोलनात सहभाग घेतला.
विरोधी पक्षनेते पवार यांनी या वक्तव्याप्रकरणी माफी मागावी, अशी जोरदार मागणी यावेळी करण्यात आली. पुणे महानगरपालीकेचे महापौर मोहोळ म्हणाले, ४० दिवस औरंजेबाच्या ताब्यात असताना धर्म बदलण्यासाठी महाराजांचे हाल करण्यात आले. परंतु धर्माशी बांधिलकी असलेल्या महाराजांना प्राणाची आहुती दिली, परंतु शरण गेले नाहीत. मग ते धर्मवीर कसे नव्हते हे अजित पवार यांनी सांगावे. जगदगुरु तुकाराम महाराज यांचा पालखी सोहळा त्यांचे मुलगा नारायण महाराज यांनी सुरु केला. परंतु मुघलांनी हा सोहळा होवू नये, यासाठी वारकºयांवर आक्रमण केले. हा सोहळा सुरु राहावा यासाठी नारायण महाराज शंभूराजेंकडे गेले. त्यांनी पालखी सोहळा व्हावा यासाठी त्यांचे सहकार्य घेतले. हे धर्म कार्यच होते. हा इतिहास आहे. पवार यांनी तात्काळ माफी मागावी अन्यथा जिल्ह्यातील प्रत्येक तालुक्यात पवार यांच्या पुतळ्याचे दहन करू,असा इशारा यावेळी देण्यात आला.