शेलपिंपळगाव : चाकणमधील कचरासमस्या कायमस्वरूपी मार्गी लावण्यासाठी चाकण नगर परिषदेने घनकचरा प्रकल्पासाठी रासे हद्दीतील ५० एकर गायरान जागा मिळण्यासंदर्भातील प्रस्ताव जिल्हा प्रशासनाला दिला आहे. मात्र रासे ग्रामस्थांचा या घनकचरा प्रकल्पाला तीव्र विरोध कायम आहे. कोणत्याही परिस्थितीत हा प्रकल्प आम्ही गावात होऊ देणार नसल्याचा ग्रामपंचायतीचा ठराव एकमताने यापूर्वीच विशेष ग्रामसभेत मंजूर करण्यात आला असून, शासनदरबारी आमची भूमिका आम्ही स्पष्ट केल्याचे सरपंच कविता मुंगसे, उपसरपंच गणेश केदारी यांनी सांगितले. रासे येथील गायरान जमीन गट क्रमांक २४४मध्ये एकूण ११५ कुटुंबातील सुमारे ५१४ लोकसंख्या वास्तव्यास आहे. तसेच राष्ट्रीय पेयजलची नळ पाणी पुरवठा योजना याठिकाणी असून पाण्याचा मुख्य स्रोत गायराननजीक पाझर तलावाजवळ आहे. या गायरानात जनावरे चरण्यासाठी कुरणक्षेत्र असून, येथील वस्तीतील नागरिकांकरिता पिण्याच्या पाण्याची टाकी, हातपंप आहे. घनकचरा प्रकल्पाने नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न निर्माण होणार असून, असंख्य समस्यांचा सामना ग्रामस्थांना करावा लागणार आहे. गावातील नागरिकांची गरज लक्षात घेता गावातील गायरान जागा महत्त्वाची असल्याने ती गावाकरिता ठेवणे योग्य असल्याचे ग्रामसभेत एकमताने यापूर्वीच मंजूर करण्यात आला असल्याने चाकण नगर परिषदेने घनकचरा प्रकल्पाचा घाट आमच्या गावात घालू नये, अशी मागणी रासेकरांकडून होऊ लागली आहे. (वार्ताहर)
घनकचरा प्रकल्पास रासेकरांचा विरोध
By admin | Published: March 25, 2017 3:23 AM