भुलेश्वर : विमानतळाच्या जुन्या जागेत संपूर्ण तालुक्याचं हित दडलेलं आहे. पुरंदर तालुक्याचं विमानतळ बारामती तालुक्यात घेऊन जाण्याचा डाव आहे, हे मी आधीच बोललो होतो. अनेकांना तो राजकीय आरोप वाटला. आज सत्य सगळ्यांच्या समोर आलं आहे. पुरंदर तालुक्याला नवीन जागेचा कसलाही फायदा होणार नाही. बारामतीच्या जिरायत पट्ट्याला सुगीचे दिवस आणण्यासाठी सगळा खटाटोप सुरू आहे. यासाठी विमानतळाच्या नवीन जागेला माझा विरोध असल्याचे मत माजी राज्यमंत्री विजय शिवतारे यांनी मांडले.
पुरंदर विमानतळ संघर्ष समितीने विमानतळ होऊ नये म्हणून शिवतारे यांची भेट घेऊन सविस्तर चर्चा केली व निवेदन दिले. त्यावेळी ते बोलत होते.
पुरंदर तालुक्यात प्रस्थापीत राजुरी, रिसे, पिसे, नायगाव, पांडेश्वर, रोमणवाडी, व बारामती तालुक्यातील भोंडवेवाडी, चांदगुडेवाडी,आंबी या प्रस्तावित गावांत विमानतळास तीव्र विरोध दर्शवण्यासाठी विमानतळ संघर्ष समिती जिवाचे रान करत आहे .विमानतळ संघर्ष समितीने विजय शिवतारे यांच्याशी सविस्तर चर्चा केली .अनेक अडीअडचणी मांडल्या. यावेळी पुरंदर विमानतळ संघर्ष समितीचे अध्यक्ष गणेश मुळीक, राष्ट्रवादीचे तालुका अध्यक्ष माणिकराव झेंडे, सोशल मीडिया जिल्हाध्यक्ष संतोष कोलते, महेश कड, महेंद्र खेसे, उद्धव भगत, हरिदास खेसे, शैलेश रोमण, किरण साळुंके, भारत बोरकर, शशिभाऊ गायकवाड, विश्वास आंबोले, सदाशिव चौंडकर, चंद्रकांत चौंडकर आदी उपस्थित होते.
पुरंदर विमानतळास विरोध करण्यासाठी विमानतळ संघर्ष समितीने माजी राज्यमंत्री विजय शिवतारे यांना निवेदन दिले.