पुणे - अभिव्यक्तिस्वातंत्र्याची गळचेपी होत आहे, असा एक खोटा आरोप भाजपा सरकारवर केला जातो. मात्र, १९७५मध्ये आणीबाणी लादून आवाज दाबण्याचा प्रयत्न कोणत्या आणि कोणाच्या सरकारने केला होता, याचे आत्मपरीक्षण करून ही दांभिकता थांबवावी, अशा शब्दांत आमदार मेधा कुलकर्णी यांनी विरोधकांवर टीकास्त्र सोडले.कविता रसिक मंडळीतर्फे ‘एका संघर्षाची यशोगाथा’ या कार्यक्रमात आमदार मेधा कुलकर्णी यांच्या विशेष मुलाखतीचे आयोजन करण्यात आले, त्या वेळी त्या बोलत होत्या. भूषण कटककर आणि ज्येष्ठ कवयित्री मृणालिनी कानिटकर-जोशी व भूषण कटककर यांनी ही मुलाखत घेतली.कुलकर्णी म्हणाल्या, ‘‘मोदी सरकारने सर्वसामान्यांना केंद्रस्थानी ठेवून पावले उचलली. मात्र, यामुळे काळ्या पैशांवर भिस्त असलेल्या लोकांच्या शेपटीवर पाय ठेवला गेला. आजही नोटाबंदीमुळे अडचणीत आलेले राजकारणातील मातब्बर नोटाबंदीविरोधात शंखनाद करीत आहेत.’’ वर्षा हळबे यांना आॅनलाईन काव्य पुरस्कार देऊन गौरविण्यात आले. या वेळी अॅड. प्रमोद आडकर यांनी स्त्री संघर्षाविषयीचा लेखाजोखा मांडला.वर्षा कुलकर्णी यांनी प्रास्ताविक केले. चिन्मयी चिटणीस यांनी सूत्रसंचालन केले. सुप्रिया जाधव यांनी आभार मानले.
विरोधकांनी दांभिकता थांबवावी : मेधा कुलकर्णी
By ऑनलाइन लोकमत | Published: February 07, 2019 1:09 AM