पळसदेव (पुणे) :इंदापूर तालुक्यात विरोधकांकडून जातीयवादाचे बीज पेरले जात आहे. जनतेला खोटे बोलायचे, जातीचे राजकारण करायचे, दिशाभूल करायची, गोड बोलून गैरसमज निर्माण करायचे काम सध्या विरोधकांनी सुरू केले आहे, असा टोला राज्यमंत्री दत्तात्रय भरणे यांनी माजी सहकारमंत्री यांचे नाव न घेता लगावला.
पळसदेव येथे पळसदेव-बिजवडी गटातील सुमारे ९७ कोटी २४ लाख रुपयांच्या कामाचा शुभारंभ राज्यमंत्री भरणे यांंच्या हस्ते करण्यात आला, यावेळी राज्यमंत्री भरणे बोलत होते. भरणे पुढे म्हणाले, विरोधकांनी १९ वर्षे मंत्रीपद भूषविले. एवढी वर्षे मंत्री असणाऱ्यांना जातीयवाद करणे शोभत नाही, अशी टीका करीत भरणे यांनी हर्षवर्धन पाटील यांच्यावर हल्लाबोल केला. जातीपातीच्या चुकीच्या आरोपामुळे, गोष्टीमुळे माझ्यासारख्या काम करणाऱ्या कार्यकर्त्याचे मन व्यथित होते, असे सांगताना भरणे भावनाविवश बनले. पाटील १९ वर्षे मंत्री होते. त्यांनी तालुक्याचा विकास केला असता तर जनतेने त्यांना घरी बसवले नसते. आता त्यांना घरी बसून काही काम नाही. त्यामुळे केवळ तालुक्याचं वाटोळं करण्याचं एकच काम त्यांच्याकडे उरलं असल्याची टीका मंत्री भरणे यांनी केली. तालुक्यात सुरू असलेल्या जातीच्या राजकारणाला इंदापूर तालुक्यातील जनता भुलणार नसल्याचे भरणे म्हणाले.
यावेळी राष्ट्रवादी तालुका अध्यक्ष हनुमंत कोकाटे, जिल्हा परिषद सदस्य प्रवीण माने, श्रीमंत ढोले ,दीपक जाधव, सचिन सपकाळ, पंचायत समिती सदस्य बाळासाहेब काळे, सरपंच इंद्रायणी मोरे, उपसरपंच सोनाली कुचेकर, मेघराज कुचेकर, सुजित मोरे, हनुमंत बनसुडे, कैलास भोसले, माजी उपसरपंच पुष्पलता काळे, चांडगावचे सरपंच मुन्ना आरडे, पोपट उचाळे, राजेंद्र काळे, अजित शिंदे, छगन बनसुडे, नीलेश रंधवे आदी उपस्थित होते.