पिंपळवंडी : पुणे-नाशिक महामार्गाच्या रस्ता रुंदीकरणात शेतकऱ्यांच्या जमिनी गेल्या आहेत. पुन्हा पुणे-नाशिक रेल्वे मार्गाच्या सर्वेक्षणकामाला सुरुवात झाली आहे. या मार्गासाठी परत शेतकऱ्यांच्या जमिनी संपादित करण्यात येणार असल्याने शेतकऱ्यांनी पुणे-नाशिक रेल्वे मार्गाला विरोध दर्शवला आहे. पुणे-नाशिक महामार्गावर रस्ता रुंदीकरणाचे काम सुरू असून या महामार्गासाठी अनेक शेतकऱ्यांच्या जमिनी संपादित करण्यात आल्या आहेत. या जमीन संपादनाला अनेक शेतकऱ्यांचा विरोध असतानाही शासनाने या जमिनी संपादित केल्या आहेत. महामार्गाच्या बाजूला असलेल्या जमिनींचा बाजारभाव आणि शासनाकडून मिळणारी नुकसानभरपाई यामध्ये मोठी तफावत असल्याने काही ठिकाणी विरोध झाला तर काही ठिकाणी शेतकऱ्यांना असलेल्या जमिनींचे प्रमाण कमी असल्यामुळे विरोध झाला होता.जुन्नर तालुक्यात वडज, येडगाव, माणिकडोह, चिल्हेवाडी, पिंपळगाव जोगा ही पाच धरणे आणि मीना कुकडी आणि पिंपळगाव जोगा हे तीन कालवे औद्योगिक वसाहत जीएमआरटी प्रकल्प पुणे-नाशिक महामार्ग या प्रकल्पांसाठी यापूर्वीच शेतकऱ्यांनी जमिनी दिल्या आहेत. अद्याप भरपाई नाही : रस्ता रुंदीकरणात जमिनी गेलेल्या अनेक शेतकऱ्यांना अद्याप नुकसानभरपाई मिळाली नाही. त्यातच पुन्हा या जमिनींचे भूसंपादन करण्यात येणार असल्याने शेतकरी हवालदिल झाले आहेत. त्यामुळे काहीही झाले तरी जमिनी देणार नाही, अशी भूमिका शेतकऱ्यांनी घेतली असून या भूसंपादनाला विरोध करण्यात येणार असल्याचे शेतकऱ्यांनी सांगितले.
पुणे-नाशिक रेल्वे मार्गाच्या सर्वेक्षणास विरोध
By admin | Published: December 25, 2016 4:44 AM