पुणे : राज्यात विधानसभा निवडणुकीची रणधुमाळी सुरू झाली आहे. विधानसभा निवडणुकीसाठी 20 नोव्हेंबरला मतदान होणार आहे. त्यासाठीच भाजप ची 99 उमेदवारांची पहिली यादी नुकतीच जाहीर झाली. या 99 जणांमध्ये बहुतांश विद्यमान आमदारांना भाजपने पुन्हा एकदा संधी दिली आहे. मात्र खडकवासला मतदार संघातील विद्यमान आमदारांना भाजपने होल्डवर ठेवलं असल्यानं खडकवासल्यातील सस्पेन्स कायम आहे, या विधानसभा मतदारसंघात कोणाच्या गळ्यात विधानसभेची माळ पडणार याची उत्सुकता शिगेला पोहोचली आहे. महायुती बरोबरच महाविकास आघाडी मध्ये तिढा कायम असून जागा नक्की कोणाच्या वाट्याला जाणार हा सस्पेन्स कायम राहणार आहे.
खडकवासला विधानसभा मतदारसंघात भाजपच्या काही नगरसेवकांनी भीमराव तापकीर यांना पुन्हा उमेदवारी देऊ नये यासाठी भाजपच्या वरिष्ठ नेत्यांची भेट घेतली होती. तर खडकवासल्यात भाजपच्या इच्छुकांची देखील मोठी गर्दी झाली आहे. त्यामुळे संभाव्य बंडाळी टाळण्यासाठी भाजपने हा मतदार संघ होल्डवर ठेवले असून खडकवासल्यात अद्यापही एकमत होताना दिसत नाही.
महायुतीचा गट पक्ष असलेल्या राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे नेते माजी महापौर दत्तात्रय धनकवडे निवडणूक लढवण्यावर ठाम आहेत. सोशल मीडिया घ्या माध्यमातून त्यांनी जोरदार प्रचार सुरू केला आहे. 2019 मध्ये धनकवडे निवडणूक लढवायला इच्छुक होतो मात्र त्यांना संधी मिळाली नाही. त्यामुळे या वेळी धनकवडे यांनी पुन्हा एकदा थंड थोपटले आहेत. विद्यमान आमदारांच्या विरोधात त्यांच्याच पक्षातील नगरसेवक गेल्याने हा मतदारसंघ जिंकणे त्यांना अवघड आहे. त्यामुळे अजितदादांनी ही जागा आपल्याकडे घ्यावी अशी आग्रही मागणी करणारे पत्र दत्तात्रय धनकवडे यांनी अजित पवारांना दिले आहे.
माजी विरोधी पक्षनेते दिलीप बराटे यांचे नाव चर्चेत आहे. २०१४ च्या निवडणुकीत तापकीर आणि बराटे यांच्यात लढत झाली होती. त्यावेळी तापकीर यांनी बराटे यांचा ६३ हजार २६ मतांनी पराभव केला होता. राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार पक्षाशी जवळीक असणारे दिवंगत आमदार रमेश वांजळे यांचे पुत्र मयूर वांजळे यांनीही या मतदार संघातून निवडणूक लढवण्याची तयारी केली आहे. त्यांचे फलक संपूर्ण मतदारसंघात झळकत आहेत. मात्र, त्यांच्या कडून अद्याप कोणतीही भूमिका स्पष्ट करण्यात आलेली नाही.
राष्ट्रवादी काँग्रेसकडून (शरदचंद्र पवार) सचिन दोडके, बाळा धनकवडे, काका चव्हाण, माजी जिल्हा परिषद सदस्य नवनाथ पारगे यांनी मैदानात उतरण्याची तयारी दाखवली आहे. खडकवासल्यात निवडून यायची तयारी करा..! असा आदेश मध्यंतरी उबाठा गटाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांचे इच्छुकांना दिला होता, त्यामुळे या मतदारसंघात शरदचंद्र पवार गटाच्या तुतारी बरोबरच मशाल ची सुद्धा चर्चा सुरू आहे.
खडकवासला विधानसभा मतदारसंघांमध्ये पूर्वीपासून शिवसेनाप्रमुख स्व. बाळासाहेब ठाकरे यांच्या विचाराला मानणारा मतदार आहे. या विधानसभा मतदारसंघाची रचना होण्यापूर्वी शिवसेनेचे आमदार शरद ढमाले हे होते. त्यामुळे मतदारसंघांमध्ये शिवसेनेचे अस्तित्व आहे. त्यामुळे उद्धव ठाकरे यांनी या मतदारसंघाची मागणी केली असल्याचे बोललं जात आहे.
या मतदारसंघात शिवसेना शिंदे गटाकडून जिल्हा परिषदेचे माजी सदस्य रमेश कोंडे यांनी तयारी सुरू केली आहे. २०१९ च्या विधानसभा निवडणुकीत कोंडे यांनी जोरदार तयारी केली होती. उमेदवारी देण्याचा आग्रहही धरला होता. मात्र त्यावेळी त्यांनी युतीधर्माचा विचार करत माघार घेतली होती. आताही कोंडे यांनी मतदारसंघात दांडगा संपर्क ठेवत आपली फळी मजबूत केली आहे. भाजपकडून माजी उपमहापौर प्रसन्न जगताप यांनीही तयारी केली आहे.
विकास दांगट यांच्या नावाची चर्चा
खडकवासला विधानसभा मतदार संघातून विकास दांगट यांच्या नावाची चर्चा अधिक आहे. मागील चार सहा महिन्यांपासून त्यांनी गाठी भेटी आणि संवाद दौऱ्या तून विकास दांगट यांनी संपूर्ण खडकवासला मतदारसंघ पिंजून काढला आहे.