शहरं
Join us  
Trending Stories
1
अहमदनगर जिल्हा बँकेने नोकर भरतीत आरक्षण वगळले; वाद पेटणार?
2
अंबाजोगाई - लातूर रोडवर भीषण अपघात; लातूर जिल्ह्यातील ४ जण जागीच ठार
3
मनोज जरांगेंची प्रकृती खालावली; बजरंग सोनवणेंचं मुख्यमंत्री अन् राज्यपालांना पत्र, म्हणाले...
4
सिनेट निवडणूक मंगळवारी होणार; सरकारच्या परिपत्रकाला स्थगिती
5
जगन्नाथ मंदिराच्या तळघरात गुप्त खजिन्याचा घेणार शोध; लेझर स्कॅनिंगचा वापर
6
परतीचा पाऊस देणार महामुंबईला तडाखा; २६ ते २९ सप्टेंबर मुसळधारेचा अंदाज
7
१४ दिवसांतच संग्राम चौगुलेची 'बिग बॉस मराठी'मधून एक्झिट, पोस्ट शेअर करत म्हणाला- "मला..."
8
स्वाभिमानी मणका तंदुरुस्त करून घ्या!; राज ठाकरेंची पुन्हा मराठी माणसांना हाक
9
Today Daily Horoscope: आजचे राशीभविष्य: महत्त्वाचा निर्णय घेण्यास दिवस अनुकूल नाही!
10
याही वेळी मुंबईत अपक्षांची संख्या लक्षणीय असणार? इच्छुकांमध्ये तिकिटासाठी रस्सीखेंच
11
पाकिस्तान मोदींना घाबरतो; आज पाकिस्तान गोळीबाराची हिंमतही करणार नाही
12
राष्ट्रवादीचे कार्यालय शरद पवार गटाचेच; लोकसभा सचिवालयाने दिले स्पष्टीकरण
13
तिरूपती लाडूबाबत अफवा पसरवणाऱ्यांवर गुन्हा; भेसळयुक्त तूप ‘अमूल’चे असल्याच्या पोस्ट
14
मुख्य निवडणूक आयुक्त ३ दिवस मुंबई दौऱ्यावर; विधानसभा निवडणुकीसाठी घेणार बैठका
15
भारतातील चाकरमानी दबले फायलींच्या ढिगाऱ्याखाली; ६१ टक्के जण आठवड्याला ४९ तासांपेक्षा अधिक राबतात
16
पंतप्रधान नरेंद्र मोदी अमेरिकेत दाखल, ‘क्वाड’ शिखर परिषदेत सहभागी होणार
17
आता मेडिकलच्या ‘पीजी’च्या जागा वाढणार; वैद्यकीय आयोगाने अर्ज मागविले
18
वरिष्ठांना लाच देण्याचा कनिष्ठाचा प्रयत्न; ‘प्रॉव्हिडंट फंड’ची सीबीआयकडे तक्रार
19
आतिशी यांच्या शपथविधीसाठी आलेले हे IAS अधिकारी कोण? जे केजरीवाल बोलत असताना हात जोडून उभे होते
20
आम्हाला दिलेल्या आश्वासनांचे काय झाले? निवासी डॉक्टरांचा सवाल

राष्ट्रवादीचा बाजार उठविण्यासाठी विरोधक एकवटले; निवडणुकीत बिनविरोधचे लक्ष्य धुळीस

By ऑनलाइन लोकमत | Published: April 05, 2023 12:23 PM

पहिल्यांदाच शेतकऱ्यांना थेट निवडणूक लढविण्याचा अधिकार देण्यात आल्याने उमेदवारी दाखल करणाऱ्यांच्या संख्येत वाढ

दुर्गेश मोरे

पुणे : जिल्ह्यातील दहा कृषी उत्पन्न बाजार समित्यांच्या निवडणुका लागल्या आहेत. पहिल्यांदाच शेतकऱ्यांना थेट निवडणूक लढविण्याचा अधिकार देण्यात आल्याने उमेदवारी दाखल करणाऱ्यांच्या संख्येत वाढ झाली आहे. सर्वांचे लक्ष लागलेल्या हवेली कृषी उत्पन्न बाजार समितीसाठी सर्वाधिक ३०१ उमेदवारी अर्ज दाखल झाले आहेत. त्यामुळे राष्ट्रवादीच्या बिनविरोधचे लक्ष्य धुळीस गेले आहे; पण त्यापेक्षाही जिल्ह्यातील राष्ट्रवादीची ताकद कमी करण्यासाठी सर्व विरोधक एकवटले आहेत. त्यामध्ये महाआघाडीतील नाराज गटांचाही समावेश आहे.

बाजार समित्यांतील कारभार सुधारण्यासाठी सर्व शेतकऱ्यांना मतदानाचा व उमेदवारीचा अधिकार असावा, अशी मांडणी करण्यात आली होती. मात्र, शिंदे-फडणवीस सरकारने किमान १० गुंठे शेती असलेल्या सर्वांना मतदानाचा अधिकार दिल्याची घोषणा केली. त्यामुळे मतदारसंख्या व खर्च खूप वाढत असल्याच्या कारणावरून काही मंत्र्यांनीच या निर्णयाला विरोध केला. महत्त्वाचे म्हणजे सरकारला हा निर्णय मागे घ्यावा लागला. त्यानंतर सरकारने थेट शेतकऱ्यांना निवडणूक लढविण्याचा अधिकार देत परिस्थिती हाताळण्याचा प्रयत्न केला. शेतकऱ्यांमध्ये आनंदाचे वातावरण किंबहुना सरकार विषयी आस्था वाटू लागली; पण या निर्णयामुळे पात्र मतदारांची संख्या कमी आणि उमेदवारीसाठी पात्र असलेल्यांची संख्या अधिक अशी विचित्र परिस्थिती निर्माण झाली आहे. सध्या १८ जागांसाठी तीन आकडी उमेदवारी अर्ज दाखल झाले आहेत. काहीही झाले तरी अर्ज माघारीच्या दिवशी म्हणजे २० एप्रिललाच खचे चित्र स्पष्ट होणार आहे.

१८० जागांसाठी १५७० अर्ज

जिल्ह्यातील दहा बाजार समित्यांमध्ये १८० जागा आहेत. त्यासाठी तब्बल १५७० उमेदवारी अर्ज दाखल झाले आहेत. शेतकऱ्यांना मिळालेल्या अधिकारामुळे सोसायटी आणि ग्रामपंचायत विभागातून उमेदवारी दाखल करणाऱ्यांची संख्या सर्वांधिक असल्याचे दिसते. भोर ८६, तर बारामती बाजार समितीसाठी ६६ उमेदवारी अर्ज दखल झाले आहेत. या दोन बाजार समिती सोडल्या तर अन्य ठिकाणी तीन अंकी उमेदवारी अर्ज दाखल झाले आहेत.

बाजार समिती दाखल उमदेवारी अर्ज संख्या

पुणे ३०१जुन्नर २५८मंचर १८२भोर ८६नीरा १४२खेड १६१इंदापूर १५७बारामती ६६दौंड २१७

हवेलीत बिनविरोधची पोकळ घोषणा

आर्थिक अनियमितता आणि गैरव्यवहार या कारणांमुळे जिल्हा उपनिबंधकांनी २००३ मध्ये हवेली कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक मंडळ बरखास्त केले होते. त्यांनतर सुमारे १९ वर्षे बाजार समितीवर प्रशासक होते. त्यामुळे इतक्या वर्षांनंतर समितीत निवडणुकीची रणधुमाळी सुरू झाल्याने सर्वत्र जोरदार फिल्डिंग सुरू आहे. आतापर्यंत या ठिकाणी राष्ट्रवादीचीच सत्ता होती. निवडणुकीची घोषणा होताच अनेकांनी शड्डू ठोकले; पण विरोधी पक्ष नेते अजित पवार यांनी जुन्यांनी थोडंसं थांबावं आणि नव्यांना संधी द्यावी असा सूचक इशारा दिला, तर दुसरीकडे बाजार समिती निवडणुकांची जबाबदारी राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष प्रदीप गारटकर यांच्याकडे दिली. गारटकर यांनी हवेली बाजार समितीची निवडणूक बिनविरोध करण्यासाठी विरोधी भाजपशी सलगी साधली; पण त्याचा काहीही उपयोग झाला नाही. कारण राष्ट्रवादीतील नाराजांची मनधरणी करणे त्यांना काही जमेना. त्यामुळे बिनविरोधची घोषणा हवेत विरली आहे.

मंचर, खेडला आढळरावांची बॅटिंग, तर जुन्नर गुलदस्त्यात

माजी खासदार शिवाजीराव आढळराव पाटील यांनी आगामी लोकसभेची जोरदार तयारी करण्यास सुरुवात केली आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेद्र फडणवीस यांच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणात अपूर्ण कामे पूर्ण करण्यासाठी तसेच नव्या कामांना तत्काळ निधी मिळवण्याचा प्रयत्न करत आहे. तसे त्यांना यशही मिळत आहे. त्यामुळे खेड, जुन्नर, आंबेगाव आणि शिरूरमध्ये आढळरावांचा गट पुन्हा एकदा चर्चेत आला आहे. आढळरावांचा शरद पवार, दिलीप वळसे-पाटील यांच्याबरोबर स्नेह आहे; पण लोकसभेसाठी आताच्या बाजार समिती निवडणुकीत चमत्कार करावा लागणार आहे. मंचर कृषी उत्पन्न बाजार समितीवर राष्ट्रवादीची सत्ता आहे. विशेष म्हणजे आढळरावांच्या होम पीचवर असणारी ही बाजार समिती. त्यामुळे काहीही करून या ठिकाणी आढळरावांना झेंडा फडकावा लागणारच आहे. तसे नाही झाले तर आगामी लोकसभेला याचा फटका बसण्याची शक्यता नाकारता येत नाही.

दुसरीकडे खेडचे राष्ट्रवादीचे आमदार दिलीप मोहिते-पाटील आणि आढळराव पाटील यांचे सख्य संपूर्ण जिल्ह्याला माहीतच आहे. त्यातच खेडच्या प्रशासकीय इमारत, त्याशिवाय विविध विकासकामांवरून दोन्ही गट एकमेकांसमोर आले आहेत; पण दोन्ही नेते ईर्षेला पेटले आहेत. आढळराव पाटील शिंदे गटात सामील होताना खेडमधील कारभार त्यांच्या पद्धतीनेच होणार असल्याची अट घातली होती. त्यानंतर प्रशासकीय इमारतीसह अन्य कामांना मंजुरी मिळाल्याच. इतकंच नाही, तर कामांनाही सुरुवात झाली. गेल्या लोकसभेमध्ये आढळरावांना खेड तालुक्यातून कमी मतदान झाल्याने तो रोषही आहे. गेल्या काही दिवसांपासून आढळराव पाटील यांचा गट पुन्हा एकदा मैदानात उतरण्याच्या तयारी आहे. त्याला भाजप आणि मोहितेंच्या विरोधकांची साथही मिळाली असून, गोरे कुटुंबीयही शिंदे गटात दाखल झाले आहे. या सर्व घडामोडींचा परिणाम म्हणजे आमदार दिलीप मोहिते आणि माजी जि. प. सदस्या सुरेखा मोहिते यांनी सोसायटीमधून उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. त्यामुळे इथंही आढळरावांची बॅटिंग पाहायला मिळणार आहे, तर जुन्नर बाजार समितीबाबतची भूमिका अजूनही गुलदस्त्यात आहे. कारण जुन्नरमध्ये १८ पैकी काही जागा आढळराव पाटील यांना देण्यात येतात. याही वेळेला असेच काही घडेल असे गृहीत धरले जात असल्याने आढळरावांची भूमिका काय असणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

इंदापूर बारामतीसाठी अजितदादांची मध्यस्थी तर दौंडला टक्कर

बारामती लोकसभा मतदार संघात ऑपरेशन लोटसमुळे इंदापूर आणि बारामती बाजार समिती निवडणुकीत विरोधी पक्षनेते अजित पवार यांना मैदानात उतरावे लागले आहे. बारामती बिनविरोध करण्याचा त्यांचा मानस होता, परंतु भाजपने एन्ट्री घेतल्याने आता अजितदादांना मैदानात उतरावे लागले आहे. इथं जरी राष्ट्रवादीचीच सत्ता येणार असली, तरी निवडणूक लागण्याची दाट शक्यता आहे.

इंदापूर बाजार समितीत मोठी खलबते सुरू आहेत. नाराजी नाट्यानंतर हर्षवर्धन पाटील यांच्या फारकत घेऊन अप्पासाहेब जगदाळे राष्ट्रवादीत दाखल झाले आहेत. बाजारसमितीवर राष्ट्रवादीची सत्ता आहे, परंतु सर्वाधिक उमेदवार हे जगदाळे यांचे आहेत. त्यातच अर्ज दाखल करण्याच्या शेवटच्या दिवशी हर्षवर्धन पाटील यांनी भाजप निवडणुकीतून बाहेर पडल्याची घोषणा केली. वास्तविक याची भाजपच्या पक्षश्रेष्ठींनी गंभीर दखल घेतली आहे. हर्षवर्धन पाटील यांचे कट्टर समर्थक असलेल्या संचालकांनी या वर्षी अर्ज दाखल केले आहेत. त्यामुळे ऐन वेळी हर्षवर्धन पाटलांची भूमिका पुन्हा बदलू शकते, तर दुसरीकडे अजितदादांनी अप्पासाहेब जगदाळे यांच्याशीही चर्चा केली असल्याचे समजते. जगदाळे गटाकडे २० ते २५ हजार मतदान आहे. त्यामुळे आगामी लोकसभेमध्ये त्याचा पुरेपूर लाभ घेण्यासाठीच बिनविरोधची व्यूहरचना अजितदादांनी आखल्याचे बोलले जाते. याशिवाय अप्पासाहेब जगदाळे यांना आमदार दत्तात्रय भरणे आणि हर्षवर्धन पाटील यांनी केवळ गाजर दाखविले आहे. त्यामुळे ते नाराज आहेत, पण आता अजितदादा काय आश्वासन देतात, यावरच निवडणूक टिकून आहे. दौंडला मात्र, पारंपरिक विरोधक असलेले माजी आमदार रमेश थोरात आणि भाजप आमदार राहुल कुल यांच्यात काटे की टक्कर पाहायला मिळेल.

भोरला काँग्रेस, तर नीरेत शिवतारे आक्रमक

भोर बाजार समितीत काँग्रेसचे आमदार संग्राम थोपटे यांची सत्ता आहे. त्यांच्या विरोधात राष्ट्रवादीचे नेते माजी उपाध्यक्ष रणजीत शिवतरे, भाजपचे तालुकाध्यक्ष जीवन कोंडे, शिंदे गटाचे अमोल पांगारे हे एकत्रित येऊन पॅनल टाकण्याच्या तयारी आहेत. मात्र, ७५ सोसायट्यांपैकी बहुतांश सोसायट्या आणि ग्रामपंचायतींमध्ये काँग्रेसचे वर्चस्व आहे. त्यामुळे इथे काँग्रेसचीच चलती आहे.

नीरा कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये काँग्रेस आणि राष्ट्रवादीची सत्ता आहे. काँग्रेस आमदार संजय जगताप यांच्यावरील नाराजीमध्ये दिवसेंदिवस वाढ होत आहे. त्यातच माजी आमदार विजय शिवतारे यांना शिंदे गटाकडून मिळालेल्या ताकदीमुळे शिवतारे यांनी आमदारांच्या विरोधकांना एकाच छताखाली आणण्याचा प्रयत्न सुरू केला आहे. केवळ काँग्रेसच नाही, तर राष्ट्रवादीतही कार्यकर्त्यांमध्ये नाराजी आहे. काही दिवसांपूर्वी ग्रामपंचायत निवडणुका झाल्या. त्यामध्ये दिवे ग्रामपंचायतीच्या निवडणुकीत दगाफटका झाल्याने बाबाराजे जाधवराव यांची सत्ता आली. त्यावेळी राष्ट्रवादीचे संभाजीराव झेंडे यांनी थेट अजितदादांना याबाबत सांगितले, परंतु त्यांनी स्थानिक पातळीवरची निवडणूक असल्याचे सांगत टोलवाटोलवी केल्याचे समजते, तर संचालक भानुदास जगताप हे आज भाजपमध्ये प्रवेश करणार आहेत, तर माजी जिल्हा परिषद अध्यक्ष जालिंदर कामठे यांनी तालुक्यात भाजपची मोट चांगलीच बांधली आहे. शिवतारे यांनीही सतीश काकडे यांच्याबरोबर बैठक घेतली. इतकंच नाही, तर निंबूत शेजारी मळशी येथे चंद्रराव तावरे यांची भेट घेत, स्नेहभोजन केल्याचेही समजते. त्यामुळे यावेळी नीरेत चमत्कारच होण्याची दाट शक्यता आहे.

टॅग्स :PuneपुणेElectionनिवडणूकNCPराष्ट्रवादी काँग्रेसMahavikas Aghadiमहाविकास आघाडीMarketबाजार