पुणे-नाशिक दरम्यान नवीन दुहेरी, मध्यम, उच्च वेगवान ब्रॉडगेज लाईनच्या विद्युतीकरणासह बांधकामाकरिता जमीन खासगी वाटाघाटीद्वारे थेट खरेदी करण्यासाठी खेड तालुक्यात अधिकारी आणि शेतकऱ्यांच्या बैठका सुरू आहेत. शनिवारी वाकी बुद्रुक येथे बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. या सभेसाठी उपविभागीय अधिकारी विक्रांत चव्हाण, महारेलचे डीजीएम सिद्धलिंग शिरोळे, सीनियर एक्झिक्युटिव्ह चंद्रकिशोर भोर, सिनियर मॅनेजर मंदार विचारे, मंडलाधिकारी सविता घुमटकर, सरपंच वैशाली जरे, सदस्य संतोष गारगोटे विठ्ठल गारगोटे,सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधिकारी एबी दिवे, तलाठी व्ही. व्ही. मुंगारे,पोलीस पाटील दत्तात्रय कड, कोतवाल सचिन टोपे व सर्व शेतकरी बांधव उपस्थित होते. उपविभागीय अधिकारी यांनी माहिती दिल्यानंतर शेतकऱ्यांनी आपल्या अडचणी अधिकाऱ्यांसमोर मांडल्या.
आजपर्यंत, १९९२ मध्ये संपादन केलेलेल्या कालव्यासाठीचे क्षेत्र, रिलायन्स लाईन, एचपी लाईन व खेड एसीझेड रस्त्यासाठी संपादन केलेले क्षेत्र या सर्व आजपर्यंतच्या जमीन संपादनामुळे आम्ही हतबल झालो आहोत.
एवढे संपादन असतानादेखील सुद्धा रेल्वेसाठी पुन्हा नव्याने जमिनी घेतल्या जात आहेत. यामुळे आम्ही भूमिहीन होणार आहोत. रेल्वे प्रकल्प हा शेती क्षेत्रातून गेल्यानंतर दुतर्फा बाजूला अल्प स्वरूपात जागा सुटत आहे या जागेचा शेतकऱ्यांना काडीमात्र फायदा होणार नाही. भूसंपादन करत असताना कुकुट पालन, घर, ओटा, बोअर वेल, कांद्याची चाळ, विहिरी व इतर अनेक स्वरूपात शेतकऱ्यांचे मोठे नुकसान होणार आहे.
त्याचबरोबर महारेलने भूसंपादन झाल्यानंतर घातलेल्या अटींना देखील शेतकऱ्यांनी या बैठकीत विरोध दर्शविला
कोट शेतकऱ्यांनी मांडलेल्या सर्व तक्रारी या आम्ही वरिष्ठ अधिकाऱ्यांसमोर मांडणार आहोत. या सर्व प्रकल्पातून शेतकऱ्यांना जास्तीत जास्त न्याय कसा देता येईल, यासाठी प्रयत्नशील राहणार आहे.
- विक्रांत चव्हाण.
( उपविभागीय अधिकारी खेड, राजगुरूनगर)
कोट
आजपर्यंत अनेक प्रकल्पासाठी आम्ही आमच्या जमिनी दिल्या आहेत. रेल्वेसाठी आता जमिनी दिल्या तर शेती क्षेत्र हे कोणत्याही उपभोगासाठी आमच्या हातात शिल्लक राहणार नाही. त्यामुळे आम्हा सर्व शेतकऱ्यांचा या प्रकल्पाला विरोध आहे.
-बाजीराव कोंडीबा जाधव, (प्रकल्प बाधित शेतकरी)
फोटोओळ:-
पुणे-नाशिक दरम्यान होत असलेल्या सेमी हायस्पीड रेल्वेला वाकी बुद्रुक येथील शेतकऱ्यांनी विरोध दाखविला.