लोकमत न्यूज नेटवर्क
पुणे : ‘सभागृह नेतेपदी भाजपने १०० नगरसेवकांमधून यावेळी हिरा निवडला आहे़ आता चार वर्षानंतर तरी पुण्याचा कारभार सुधारेल,’ ‘पुण्याला अनुभवी सभागृह नेता मिळाला़ ’ ‘घाटे हे देखील चांगले काम करत होते, त्यांना जरा आणखी संधी द्यायला हवी होती,’ असे चिमटे घेणाऱ्या विरोधकांना अंगावर घेत भाजपा नगरसेवक गणेश बिडकर महापालिकेच्या सभागृह नेतेपदाच्या कामाची सोमवारी (दि. २१) सुरुवात केली.
विरोधकांच्या या ‘पुणेरी स्वागता’लाही बिडकर यांनी तेवढाच जोरदार प्रतिसाद दिला. ‘ना मै गिरा, ना मेरे उम्मिदोंके मिनार गिरे ! पर लोग मुझे गिराने मै कई बार गिरे !’, ‘सवाल जहर का नही था, वो तो मै पी गया ! तकलीफ लोगों तब हुई, जब मै जी गया !’, अशी जोरदार शेरोशायरी सादर करत बिडकर यांनी विरोधकांना उत्तर दिले. “सभागृहात आता मी भाजपचा गटनेता म्हणून नव्हे तर सभागृहाचा समन्वयक म्हणून काम करणार आहे,” असे सांगत समंजस सत्ताधाऱ्याचीही भूमिका बिडकर यांनी घेतली
स्वीकृत सदस्य सभागृह नेतेपदी नियुक्त झाल्याची घटना महापालिकेच्या इतिहासात प्रथमच घडली़ यामुळे विरोधकांनी बिडकर यांचे अभिनंदन करताना भाजपला चिमटे काढण्याची संधी सोडली नाही़ कॉंग्रेस गटनेते आबा बागुल यांनी, ‘तुम्ही तीन वेळा निवडून आला आहात़ यंदा पक्षाने तुम्हाला संधी दिली आहे़ चार वर्षात नाही झाला तेवढा विकास यापुढील वर्षभरात होईल अशी आम्हाला आशा आहे,’ असे सांगितले़
शिवसेनेचे गटनेते पृथ्वीराज सुतार यांनी, ‘खरे तर वरच्या सभागृहात बिडकर जायला हवेत अशी आमची इच्छा होती,’ असे सांगितले़ पण त्यांच्या अनुभवाचा या सभागृहाला चांगला उपयोग होईल व आता तरी सर्वांना सोबत घेऊन काम कराल, अशी अपेक्षा व्यक्त केली. मनसे गटनेते वसंत मोरे यांनी बिडकर यांना चार वषार्नंतर चांगली संधी मिळाली असल्याचे सांगून, शेवटच्या ओव्हर मध्ये त्यांना खूप रन्स करायचे असून ‘लेट आहे पण थेट’ आहे, असे सांगितले. विरोधी पक्षनेत्या दीपाली धुमाळ यांनी बिडकर हे सर्व सदस्यांना न्याय देतील अशी अपेक्षा व्यक्त केली.