पुणे : अरबी समुद्रात दक्षिण गुजरात ते उत्तर कर्नाटकच्या किनारपट्टीपर्यंत पसरलेल्या कमी दाबाच्या पट्ट्यामुळे येत्या दोन दिवसांत रायगड व रत्नागिरी जिल्ह्यात काही ठिकाणी मुसळधार ते अति मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे. हवामान विभागाने हा अंदाज वर्तवला असून, तेथे ऑरेंज अलर्ट जारी केला आहे. मुंबई, ठाणे, पालघर जिल्ह्यात काही ठिकाणी मुसळधार पावसाची शक्यता आहे.
राज्यात गुरुवारी सायंकाळी साडेपाच वाजेपर्यंत मागील २४ तासांत कोकणात मुसळधार पाऊस झाला. सर्वाधिक मुंबईत १२६ मि.मी., तर रत्नागिरीत ८३ मि.मी. पाऊस झाला. सांताक्रूझ, अलिबाग येथे ५३ मि.मी. तर डहाणूत २१ मि.मी. पाऊस झाला. विदर्भातील अमरावतीत १५, वर्धा १४, बुलडाणा ६, नागपूर ४, ब्रह्मपुरी, चंद्रपूर १ तर मध्य महाराष्ट्रातील कोल्हापूरमध्ये ९, महाबळेश्वर ८, सांगली ५ मि.मी. पाऊस पडला. कोकण वगळता उर्वरित भागात येत्या चार दिवसांत हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस पडण्याची शक्यता आहे.
शहरात हलका पाऊस
पुणे शहरात गुरुवारी सकाळपासून ढगाळ वातावरण होते. दुपारी बारानंतर पूर्व भागातील हडपसर, मुंढवा परिसरात हलक्या स्वरूपाचा पाऊस झाला. सांयकाळी शहरात मध्य भागात हलका पाऊस पडला.