पुणे : बंगालच्या उपसागरात निर्माण झालेल्या कमी दाबाच्या क्षेत्राबरोबर गुजरात किनारपट्टीवर द्रोणीय स्थिती निर्माण झाली असून त्यामुळे पालघरसह पश्चिम किनारपट्टीवर मुसळधार पावसाचा इशारा हवामान विभागाने दिला आहे. पुणे, नाशिक, सातारा, कोल्हापूर जिल्ह्यातील घाट परिसरात ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे.
गेल्या २४ तासात कोकण, गोवा व मध्य महाराष्ट्रात काही ठिकाणी तर विदर्भात तुरळक ठिकाणी मुसळधार पाऊस झाला. कोकणातील बेलापूर १४०, राजापूर १३०, हर्णे १०० मि.मी. पावसाची नोंद झाली असून बहुतांश ठिकाणी जोरदार पाऊस झाला. मध्य महाराष्ट्रातील गगनबावडा १५०, महाबळेश्वर, पेठ १००, इगतपुरी, नवापूर ९०, अक्कलकुवा, भोर, लोणावळा, सुरगणा येथे ७० मि.मी. पाऊस झाला. इतरत्र मध्यम स्वरूपाचा पाऊस झाला.
मराठवाड्यात अनेक ठिकाणी मध्यम स्वरूपाचा पाऊस झाला असून विदर्भात काही ठिकाणी जोरदार पावसाची नोंद झाली होती.
सोमवारी दिवसभरात डहाणू ८२ तर महाबळेश्वर येथे ८१ मि.मी. पावसाची नोंद झाली आहे. पणजी येथे १९ मि.मी. पाऊस झाला आहे. राज्यात मंगळवारी पालघर येथे ऑरेंज अलर्ट देण्यात आला असून पुणे, कोल्हापूर, नाशिक, सातारा जिल्ह्यातील घाट परिसरात मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे.
रायगड, रत्नागिरी, धुळे, नंदुरबार, अकोला जिल्ह्यात जोरदार पावसाची शक्यता आहे. जालना, परभणी, हिंगोली, अमरावती, नागपूर, वर्धा, वाशिम, यवतमाळ या जिल्ह्यात मेघगर्जना व विजांचा कडकडाटासह पावसाची शक्यता असल्याचा अंदाज हवामान विभागाने व्यक्त केला आहे.