पुणे : हडपसर येथील अॅमेनोरा स्कूलने पालकांनी फी भरली नाही म्हणून दोनशेपेक्षा जास्त विद्यार्थ्यांचे दाखले कुरिअरने त्यांच्या घरी पाठविले होते. शिक्षण उपसंचालकांनी शाळेची ही कृती शिक्षण हक्क कायदा तरतुदीचा भंग करणारी असल्याचे स्पष्ट करून त्या विद्यार्थ्यांचे प्रवेश पूर्ववत करण्याचे आदेश शाळेला दिले आहेत. अॅमेनोरा स्कूलच्या या कृतीविरोधात पालकांनी गुरूवारी सकाळी शाळेसमोर आंदोलन केले होते. शुक्रवारी शिक्षण उपसंचालक मिनांक्षी राऊत यांची भेट घेऊन पालकांनी याबाबत तक्रार केली. यापार्श्वभुमीवर शाळेने तातडीने या विद्यार्थ्यांचे प्रवेश पूर्ववत करण्याचे आदेश प्रभारी शिक्षण उपसंचालक मिनांक्षी राऊत यांनी दिले आहेत. अॅमेनोरा स्कूलने मागील शैक्षणिक वर्षात केलेल्या शुल्क वाढीला पालकांकडून सातत्याने विरोध करण्यात येत आहे. शाळेने २०१८-१९ या शैक्षणिक वर्षाचे शुल्क ६५ हजार रूपयांवरून ८५ हजार इतके केले होते. शुल्कवाढ करताना नियमानुसार पालक शिक्षक संघाची मान्यता घेण्यात आली नाही. त्यामुळे ही शुल्कवाढ बेकायदेशीर असल्याने भरण्यास पालकांकडून नकार दिला होता. मात्र शाळा प्रशासन शुल्कवाढ करण्यावर ठाम होते. शैक्षणिक वर्ष संपल्यानंतर अचानक अॅमेनोरा शाळा प्रशासनाने दोनशे पालकांच्या त्यांच्या पाल्यास शाळेतून काढून टाकल्याचे स्पष्ट करून त्यांचे दाखले घरपोच पाठवून दिले. यामुळे पालकांना मोठा धक्का बसला. शाळेमध्ये कार्यरत असलेल्या पालक-शिक्षक संघाच्या मान्यतेनंतर दर दोन वर्षांनी १५ टक्के शुल्क वाढ शाळांना मान्यता दिली आहे. मात्र या तरतुदीचे उल्लंघन करून अनेक इंग्रजी माध्यमांच्या शाळांकडून बेकायदेशीरपणे शुल्क वाढ करण्याचे प्रकार सातत्याने घडत आहेत. याबाबत शाळांवर ठोस कारवाई शिक्षण विभागाकडून होत नसल्याची तक्रार पालकांनी केली आहे.
अॅमेनोराच्या ‘त्या’२०० विद्यार्थ्यांचे प्रवेश पूर्ववत करण्याचे आदेश
By ऑनलाइन लोकमत | Published: March 22, 2019 7:33 PM
अॅमेनोरा स्कूलच्या या कृतीविरोधात पालकांनी गुरूवारी सकाळी शाळेसमोर आंदोलन केले होते.
ठळक मुद्देदाखले पाठविण्याची कृती बेकायदेशीर : तात्काळ कार्यवाही कराअॅमेनोरा स्कूलने मागील शैक्षणिक वर्षात केलेल्या शुल्क वाढीला पालकांकडून सातत्याने विरोध शुल्कवाढ बेकायदेशीर असल्याने भरण्यास पालकांकडून नकार