पुणे : भीम अॅपद्वारे कॉर्पोरेशन बँकेतून आयडीबीआय बँकेत दहा हजार रुपये वर्ग करुनही जमा न झाल्यामुळे ग्राहक मंचाकडे दावा दाखल केलेल्या तक्रारदाराला मंचाने दिलासा दिला. अॅपमधील त्रुटीमुळे रक्कम जमा झाली नसल्याचे निरीक्षण नोंदवून तक्रारदाराला दहा हजार रुपये परत देण्याचा आदेश मंचाने दिला आहे. तसेच, नुकसान भरपाईपोटी ५ हजार आणि दाव्याच्या खर्चापोटी ३ हजार रुपये देण्यात यावे, असेही मंचाने स्पष्ट केले. जिल्हा ग्राहक न्यायमंचाचे अध्यक्ष एम. के. वालचाळे, सदस्य शुभांगी दुनाखे, एस. के. पाचरणे यांनी हा निकाल दिला. छोटेलाल प्रसाद (रा. प्रीतम प्रकाश नगर, ता. शिरुर) यांनी मंचाकडे दावा दाखल केला होता. त्यांनी नोडल आॅफिसर, भीम अॅप, नॅशनल पेमेंट्स कॉपोर्रेशन आॅफ इंडिया, द कॅपिटल, बांद्रा कुर्ला कॉम्प्लेक्स, बांद्रा, कॉपोर्रेशन बँक घोडनदी शाखा, शिरुर यांच्याविरुद्ध दावा दाखल केला होता. भीम अॅपद्वारे देशभरात एका खात्यावरुन दुसऱ्या खात्यामध्ये पैसे वर्ग केले जातात. हे अॅप्लिकेशन मोबाइल बँकिंगवर आधारित आहे. तक्रारदाराचे कॉपोर्रेशन बँकेत खाते होते. तक्रारदाराने या बँकेच्या शिरुरमधील खात्यातून दहा हजार रुपये आयडीबीआय बँकेच्या खात्यात वर्ग केले. सात आॅगस्ट २०१७ रोजी त्यांनी हे पैसे वर्ग केले होते. तक्रारदाराला त्याबाबतची रिसीट भीम अॅप्लिकेशनद्वारे मिळाली होती. मात्र तक्रारदाराच्या लक्षात आले की, आयडीबीआय बँकेच्या खात्यात दहा हजार रुपये जमा झालेले नाहीत. बँकेच्या खात्यातून दहा हजार रुपये काढण्यात आल्याचे दाखविण्यात येत असले तरी ती रक्कम दुसऱ्या खात्यात जमा झालेली नव्हती. चौकशी केल्यावर आयडीबीआय बँकेने तक्रारदाराला एसएमएस पाठविला. तक्रारदाराच्या खात्यासाठी त्या बँकेत युपीआय सर्व्हिसची (युनिफाइड पेमेंट सर्व्हिस)परवानगी देण्यात आलेली नाही, असे आयडीबीआय बँकेने कळविले. त्यानंतर तक्रारदार परत कॉपोर्रेशन बँकेकडे गेले. त्यांना पाठविण्यात आलेल्या एसएमएस मध्ये दहा हजार रुपये तक्रारदाराच्या एसबीआय बँकेच्या खात्यात पाठविण्यात आल्याचे सांगण्यात आले.मात्र, त्यांच्या एसबीआयच्या खात्या दहा हजार रुपये जमा झाल्याची नोंदच नव्हती. याप्रकरणी कोणतेही उत्तर न मिळाल्यामुळे तक्रारदाराने नोटीस पाठविली. भीम अॅपच्या नोडल आॅफिसरतर्फे सादर केलेल्या लेखी जबाबात तक्रारदार हे त्यांचे ग्राहक नसल्याचे सांगण्यात आले. इलेक्ट्रॉनिक पेमेंट सिस्टीम सर्व्हिस प्रोव्हायडर असून रिझर्व बँकेकडून त्यांना अधिकृत मान्यता देण्यात आली आहे. तक्रारदाराने युपीआयडी आॅप्शन वापरण्याऐवजी मोबाइल नंबर किंवा खाते क्रमांक एसबीआयला जोडला होता. त्यानंतर त्यावर पैसे जमा केले. तक्रारदाराने एसबीआय बँकेचा पर्याय निवडला म्हणून त्यावर पैसे जमा झाले. भीम अॅप त्याला जबाबदार नाही, असे उत्तर दिले.भीम अॅप हे सर्व्हिस देणारे आहेत, हे त्यांनी लेखी जबाबात मान्य केले. त्यामुळे तक्रारदार हे त्यांचे ग्राहक होतात. रक्कम कोठे गेली हे सांगण्यातच आले नाही. यावरुन लक्षात येते की या अॅपमध्ये त्रुटी आहेत. तक्रारदाराच्या कॉर्पोरेशन बँकेतून दहा हजार रुपये वजा करण्यात आले. मात्र, ते इतर कोणत्याही बँकेत जमा करण्यात आले नाही, ही त्रुटीच आहे. त्यामुळे तक्रारदाराचे नुकसान झाले. नुकसान भरपाई मिळण्यास तक्रारदार पात्र असल्याचा आदेश ग्राहक मंचाने दिला.
भीम अॅपला ५ हजार नुकसानभरपाई देण्याचा आदेश
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 26, 2018 8:41 PM
भीम अॅपद्वारे देशभरात एका खात्यावरुन दुसऱ्या खात्यामध्ये पैसे वर्ग केले जातात. हे अॅप्लिकेशन मोबाइल बँकिंगवर आधारित आहे.
ठळक मुद्देग्राहक मंच : अॅपमधून पैसे वर्गकरुनही खात्यात रक्कम झाली नाही वर्ग इलेक्ट्रॉनिक पेमेंट सिस्टीम सर्व्हिस प्रोव्हायडर असून रिझर्व बँकेकडून त्यांना अधिकृत मान्यता