लोणी काळभोर : वरिष्ठ कार्यालयांकडून आलेल्या लेखी आदेशानुसार वहिवाटीच्या मोजण्या तालुका भूमी अभिलेख कार्यालयाने बंद करण्याचा आदेश बजावल्याने खातेदार व शेतकरी आक्रमक झाले आहेत. मोजणी अर्जदार व कार्यालयातील कर्मचारी यांच्यात शाब्दिक चकमक झडून वाद होऊ लागले आहेत. यापूर्वी मोजणी अर्ज स्वीकारले. त्यानुसार मोजणीही केली; मग आताच मोजणी अर्ज का नाकारता? या सवालावरून भूमी अभिलेख कार्यालयात संतप्त शेतकरी व शासकीय कर्मचाऱ्यांमध्ये वाद होऊन वेळप्रसंगी एकमेकांच्या अंगावर धावून जाण्याचे प्रकार घडू लागले आहेत. शासकीय फी कोशागारात जमा होत असल्याने वहिवाटीच्या मोजण्या पूर्ववत सुरू करण्याची मागणी नागरिकांनी केली आहे.जमाबंदी आयुक्त आणि संचालक भूमी अभिलेख पुणे यांनी वेळोवेळी सूचना देऊन हद्द कायमची मोजणी प्रकरणे योग्य प्रक्रियेद्वारे करणेबाबत सूचना दिलेल्या आहेत. नगर भूमापन अधिकारी व काही तालुका निरीक्षक भूमी अभिलेख यांच्या कार्यालयातून स्व-अधिकारात मूळ अभिलेखाचा आणि वरिष्ठ कार्यालयातील हद्द कायमच्या मोजणी प्रक्रियेतील सूचनांचा कोणताही आधार न घेता स्वअधिकारात मोजणी करीत असल्याचे आढळून आले आहे. त्यामुळे बेकायदेशीर प्रक्रिया तत्काळ बंद करण्यात यावी. यामुळे भूमी अभिलेख शाखेचे तत्कालीन उपसंचालक विलास पाटील यांनी २००९मध्ये बेकायदेशीर वहिवाटीच्या मोजण्या करू नयेत, असा महत्त्वाचा पत्रकीय आदेश पुणे, सातारा, सांगली, कोल्हापूर व सोलापूर या जिल्ह्यांतील भूमी अभिलेख कार्यालयांना जारी केला होता. मात्र, त्याची प्रभावी अंमलबजावणी झाली नसल्याने हे लेखी पत्रक २००९पासून अडगळीत पडले होते. यावर शेतकऱ्यांनी शासनाच्या वतीने वहिवाटीच्या मोजण्या तत्काळ पूर्ववत सुरू कराव्यात, अशी आग्रही मागणी केली असून २००९च्या परिपत्रकाची अंमलबजावणी आताच का केली जाते? असा प्रश्न त्यांच्यापुढे आहे. (वार्ताहर)
वहिवाटीच्या मोजण्या बंद करण्याचे आदेश
By admin | Published: January 10, 2017 2:48 AM