वडगाव मावळ : इंदोरी, ता. मावळ येथील महाराष्ट्र राज्य महसूल खात्याच्या गट नंबर ४२४ मधील २५ गुंठे जागेवर तोलानी एज्युकेशन फाउंडेशन यांनी अतिक्रमण केले असून, तहसीलदार शरद पाटील यांनी मंडलाधिकाऱ्यांना अतिक्रमण काढण्यास लेखी आदेश दिले आहेत. अधिकारी आणि फाउंडेशनमधील आर्थिक संगनमतामुळे गेल्या अनेक वर्षांत अतिक्रमण काढण्यात आले नाही या संदर्भात ‘लोकमत’ने ‘लेखी आदेशाला वाटण्याच्या अक्षता?’ हे वृत्त प्रसिद्ध केले होते. याची दखल घेत तळेगाव दाभाडेचे मंडलाधिकारी यांनी जागेवर जाऊन पंचनामा केला होता. तहसीलदार पाटील यांनी मुंबई कूळवहिवाट शेतजमीन अधिनियम १९४८चे कलम ८४ क अन्वये फाउंडेशनची ताबा असलेली गट नंबर ५६४ अधिनियम १९६६चे कलम ६३ अन्वये शर्तभंग केल्यामुळे ही जमीन सरकार जमा करण्याचा आदेश दिला आहे. शासकीय जमिनीवर तोलानी फाउंडेशनने पाणी अडवण्यासाठी बांधकाम केले असून, शासकीय जागेत डांबरी रस्ता बनवण्यात आला असल्याचा आरोप इंदोरी येथील शेतकरी भालेकर यांनी केला आहे. (वार्ताहर)
अतिक्रमण हटविण्याचे आदेश
By admin | Published: August 12, 2016 1:00 AM