पुणे : महिलांवरील अत्याचारात मोठ्या प्रमाणावर वाढ झाल्याचे दिसून येत आहे. असे असले तरी महिलांवर झालेल्या अत्याचाराबाबत महिला तक्रार स्पष्टपणे मांडण्यास पुढे येत नाहीत, अशा वेळी पोलीस ठाणेपातळीवर महिला दक्षता समिती अशा पीडित महिलांना न्याय मिळवून देण्यासाठी त्यांची पुनर्स्थापना व बळकटीकरण करण्याचे आदेश पोलीस महासंचालकांनी दिले आहेत. पोलीस महासंचालक कार्यालयातील विशेष पोलीस महानिरीक्षक रश्मी जाधव यांनी हे आदेश काढले आहेत.
दक्षता समितीतील महिला सदस्य या कोणत्याही राजकीय पक्षाच्या प्रभावाखाली नसाव्यात, असे सुचविण्यात आले आहे. कोरोना संसर्गांमुळे गेल्या एक वर्षांपासून अशा समितीच्या बैठका घेणे बंद झाले होते. त्या पुन्हा सुरु करण्याचे सूचविण्यात आले आहे.महिला दक्षता समिती पोलीस ठाणे व परिमंडळ स्तरावर पुनश्च कार्यान्वित करण्यात यावी. या महिला दक्षता समितीचा उद्देश हा महिलांच्या संदर्भात विशेषत: विवाहित महिलांच्या अनुषंगाने त्यांच्या संसारात होणार्या घरगुती हिंसाचाराबद्दल इतर अत्याचारासंदर्भात पोलीस ठाणे स्तरावर पिडित महिलांना न्याय मिळवून देण्यास मदत करेल. सर्व जातीधर्माचे प्रतिनिधीत्व करणार्या महिला सदस्य असाव्यात. समितीमध्ये १० महिला सदस्या असाव्यात.
पोलीस ठाण्याच्या स्तरावर दर आठवड्यामध्ये किमान एकदा महिला दक्षता समितीच्या सदस्यांना बोलावून व त्यांच्या समक्ष अर्जदार व गैरअर्जदार यांना बोलावून घटनेच्या संदर्भामध्ये माहिती घ्यावी व तात्काळ त्यांचे निवारण करावे. जर कौटुंबिक वाद विवाद यांचे निराकरण पोलीस ठाणे स्तरावरील समितीमध्ये झाले नाही तर ते प्रकरण हे परिमंडळ पोलीस अधिकारी स्तरावर कार्यरत असणार्या समितीसमोर ठेवण्यात यावे.
महिला दक्षता समिती ही पोलीस ठाण्याच्या स्तरावर काम करीत असताना फक्त विवाहित महिलांच्या संदर्भातच चर्चा करण्यात येऊ नये, तर पोलीस ठाण्याच्या हद्दीमध्ये महिलांच्या अनुषंगाने दाखल होणारे छेडछाडीचे गुन्हे, महिलांवरील लैगिक अत्याचारावरील गुन्हे व पोलिसांनी कोणती व काय कारवाई केली आहे. व काय करणे अपेक्षित आहे. दक्षता समिती सदस्यांची काय भूमिका आहे, यावरही चर्चा व्हावी़ ...कोरोना संसर्गामुळे मार्च २०२० मध्ये पहिला लॉकडाऊन सुरु झाल्यानंतर महिला दक्षता समितींसह सर्व समित्यांच्या बैठका घेणे बंद करावे लागले होते. महिलांवरील हिंसाचाराच्या घटनेत या काळात काही समस्या असेल तर समितीतील सदस्य महिलांशी संपर्क साधून त्यांच्याशी फोनवरुन सहकार्य घेण्यात येत होते. आता पुन्हा समितीच्या बैठका सुरु करण्यात येतील, असे पोलीस अधिकार्यांनी सांगितले.