यवत : यवत ग्रामपंचायतीच्या सरपंच रजिया अजमुद्दिन तांबोळी यांना सरकारी जागेत अतिक्रमण केल्याच्या प्रकरणात दोषी आढळल्याने अपात्र ठरविण्याचा आदेश अपर जिल्हाधिकारी (पुणे) प्रदीप पाटील यांनी दिला आहे.काही महिन्यांपूर्वी यवत ग्रामपंचायतीची पंचवार्षिक निवडणूक होऊन ग्रामपंचायतीच्या सरपंचपदी रजिया तांबोळी यांची वर्णी लागली होती. त्यानंतर यवतमधील रोहन कैलास दोरगे व अशोक जगन्नाथ जांबले यांनी रजिया तांबोळी या शासकीय जागेवर अतिक्रमण करून राहत असल्याने त्यांना अपात्र ठरविण्याची मागणी केली होती.या प्रकरणात अप्पर जिल्हाधिकाऱ्यांसमोर सुनावणी झाली. तीत अर्जदार, त्यांचे वकील एस. सी. खान तसेच जाब देणार सरपंच रजिया तांबोळी व त्यांचे वकील यांनी तोंडी व लेखी युक्तिवाद केला. सरपंच रजिया तांबोळी यांनी शासकीय योजनेतून बेघरांसाठी मिळालेल्या यवतमधील जमीन गट नं. ९१४/२४ मधील १ आर क्षेत्रापैकी १/५ हिस्सा वरसाने मिळालेला असताना अधिक जागेवर अतिक्रमण करून बांधकाम केले. हे बांधकाम केलेला शासकीय उतारा व रेकॉर्ड त्यांच्याच नावावर असल्याने ग्रामपंचायत सदस्यपद व सरपंचपद रद्द करण्याची मागणी अर्जदारांनी केली होती. सरपंच रजिया तांबोळी यांच्या वतीने आरोपांचे खंडन करण्यात आले होते. अर्जदारांनी केलेले आरोप चुकीचे असल्याचे सांगून त्यात तथ्य नसल्याचे त्यांनी म्हटले होते. याबाबत अपर जिल्हाधिकारी यांना दौंड तहसील विभागाने दिलेल्या अहवालात रजिया तांबोळी यांच्या ताब्यात मिळालेल्या क्षेत्रापेक्षा ३१ चौ.फूट जास्त क्षेत्र दिसून येत असल्याने त्या अपात्र ठरत असल्याचे नमूद केले होते. सर्व गोष्टी व म्हणणे ऐकून घेऊन अपर जिल्हाधिकारी यांनी रजिया तांबोळी यांना सदस्यपदासाठी अनर्ह ठरविण्याचा आदेश दिला आहे. मागील पंचवार्षिकमध्ये त्या वेळचे सरपंच श्याम शेंडगे यांना आर्थिक नियमितता ठेवल्याने अपात्र ठरविण्यात आले होते. त्यानंतर आता सलग दुसऱ्या वेळी सरपंचपदावरील व्यक्तीीला अपात्र ठरविण्यात आले आहे. (वार्ताहर)
यवतच्या सरपंचांना अपात्र ठरवण्याचा आदेश
By admin | Published: December 19, 2015 3:03 AM