पुणे : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर निर्माण झालेल्या परिस्थितीमुळे विद्यार्थ्यांंना शालेय पोषण आहार मिळत नसल्याची माहिती समोर आली आहे.त्यामुळे शालेय पोषण आहारता दिल्या जाणा-या तांदळाचे व कडधान्याचे वाटप विद्यार्थ्यांमध्ये करावे, असे आदेश राज्य शासनाने काढले आहेत.
राज्यात शासनातर्फे अंगणवादीसह शालेय विद्यार्थ्यांना शालेय पोषण आहार दिला जातो. त्यात तांदूळ, डाळी व कडधान्य आदींचा समावेश असतो. तसेच प्रत्येक शाळेकडे एक ते दोन महिन्यांचे धान्य उपलब्ध असते. 'कोरोना' मुळे मार्च महिन्यातच शाळांना सुट्टी जाहीर करण्यात आली. त्याचप्रमाणे इयत्ता पहिलीपासून ते आठवीपर्यंतच्या परीक्षा रद्द करण्यात आल्या. सध्या शाळा व अंगणवाड्या बंद आहेत. त्यामुळे विद्यार्थ्यांना शालेय पोषण आहार दिला जात नव्हता. तसेच याबाबत सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल करण्यात आली होती. त्यावर न्यायालयाने केंद्र सरकारचे मत विचारात घेतले.तसेच ग्रामीण भागातील जिल्हा परिषदेच्या शाळांसह खासगी शाळा, हंगामी वसतीगृहातील विद्यार्थ्यांना शालेय पोषण आहारात दिले जाणारे धान्य वितरीत करण्याचे आदेश दिले .
उप सचिव राजेंद्र पवार यांनीही याबाबत परिपत्रक काढले आहे. त्यानुसार शाळेचे मुख्याध्यापक योजनेचे काम पहाणारे शिक्षण व शालेय व्यवस्थापन समितीचे सदस्य यांनी शाळेत शिल्लक असणाऱ्या धान्याचा आढावा घ्यावा. त्यानंतर सर्व विद्यार्थ्यांना समान धान्य वाटप करावे.धान्य वाटप करताना शाळेत गर्दी होणार नाही याची खबरदारी घ्यावी. प्रत्येक विद्यार्थी व पालकांना वेळा ठरवून द्याव्यात. शाळेत धान्य वाटप करण्यापूर्वी त्याची माहिती जिल्हाधिकारी व स्थानिक पोलिसांना देणे बंधनकारक आहे. धान्य वाटप करण्यासाठी शाळेत आलेल्या पालकांमध्ये एक मीटरचे सामाजिक अंतर असले पाहिजे.पालक किंवा विद्यार्थी आजारी असल्यास त्यांना घरपोच धान्य देण्याची सोय करावी,असे पवार यांनी काढलेल्या परिपत्रकात नमुद केले आहे.
प्रतिक्रिया :
जिल्हा परिषदेच्या बहुतांश शाळांमध्ये दोन महिन्यांचा शालेय पोषण आहाराचा धान्य साठा उपलब्ध असू शकतो. सध्या शाळा बंद असल्यामुळे शालेय पोषण आहार अंतर्गत दिले जाणारे तांदूळ, डाळी,कडधान्य यांचे वाटप विद्यार्थ्यांना करणे शक्य होत नाही. शालेय पोषण आहारात दिल्या जाणाऱ्या धान्याचे योग्य वेळी वाटप न झाल्यास ते खराब होऊ शकते. त्यामुळे शाळेचे मुख्याध्यापक व शिक्षकांनी सर्व धान्याचे वाटप शाळेमध्ये गर्दी होऊन देता वितरीत करावे."
- दत्तात्रेय जगताप, संचालक, प्राथमिक शिक्षण, महाराष्ट्र राज्य