पुणे : आपली मोटार चोरीला गेली नसल्याचे माहिती असतानाही खोटी फिर्याद दिल्याबद्दल महिलेविरुद्ध गुन्हा दाखल करण्याचा आदेश न्यायालयाने दिला आहे़ हदिसुन्निसा वाहिदुल्ला खान (वय ३०, रा़ काळेपडळ, हडपसर) असे या महिलेचे नाव आहे़ याप्रकरणी वाहाब मोहंमद नइम खान (वय ३६, रा़ सय्यदनगर, महंमदवाडी, हडपसर) यांनी प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी ओ़ ए़ साने यांच्या न्यायालयात दाद मागितली होती़.याबाबतची हकिकत अशी, हदिसुन्निसा खान यांनी वानवडी पोलीस ठाण्यात १४ आॅक्टोबर २०१५ रोजी मोटार लोकांनी चोरून नेल्याची फिर्याद दिली होती़ या गुन्ह्याचा तपास करताना पोलिसांना ही मोटार वाहाब खान यांच्याकडे मिळून आली़ पोलिसांनी त्यांच्यासह दोघांना अटक केली व पोलीस कोठडी घेतली़ पोलिसांनी केलेल्या तपासात हदिसुन्निसा खान आणि वाहाब खान यांची पूर्वीपासून ओळख होती़ ते उत्तर प्रदेशात शेजारी शेजारी राहणारे आहेत़ ही मोटार हदिसुन्निसा खान त्यांच्या नावावर असली तरी त्याचे हप्ते हे वाहाब खान भरत होते़ त्यामुळे एक वर्षापासून ती त्यांच्याच ताब्यात होती़ त्याबाबतची कागदपत्रे सादर केल्यावर वानवडी पोलिसांनी या गुन्ह्यात बी समरी अहवाल दाखल केला़ न्यायालयाने हा अहवाल मान्य करून त्यांची सुटका केली़ त्यानंतर वाहाब खान यांनी अॅड. हर्षद मांडके यांच्यामार्फत लष्कर न्यायालयात दाद मागितली़ न्यायालयाने खोटी फिर्याद दिल्याबद्दल गुन्हा दाखल करण्याचे आदेश दिले आहेत़ (प्रतिनिधी)
महिलेविरुद्ध गुन्हा दाखल करण्याचे आदेश
By admin | Published: March 20, 2017 4:38 AM