राजगुरुनगर : पुणे-नाशिक महामार्गावर तसेच पाबळ रोड, वाडा येथे नव्याने अनधिकृतपणे सुरू झालेल्या पत्राशेडवर अतिक्रमणविरोधी पथककारवाई करणार असल्याची माहिती उपविभागीय अधिकारी आयुष प्रसाद यांनी दिली. ‘लोकमत’ने येथील अतिक्रमणाविषयीचे वृत्त प्रसिद्ध केले होते. याची दखल घेऊन हा आदेश देण्यात आला आहे. यामुळे येथील रस्ते पुन्हा मोकळा श्वास घेणार आहेत.राजगुरुनगर येथील अतिक्रमणांमुळे या मार्गावर वाहतुकीच्या अनेक समस्या निर्माण झाल्या होत्या. याबाबतचे वृत्त लोकमतने प्रसिद्ध केले होते. याची दखल उपविभागीय अधिकारी आयुष प्रसाद व नगर परिषदेने घेतली आहे. यामुळे येथील अतिक्रमणे पुन्हा काढण्यात येणार आहेत. शहरातील पुणे-नाशिक महामार्गालगत असणाºया डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यालगत रातोरात लोखंडी खांब उभे करून पथारी व्यावसायिकांनी दुकाने थाटली होती. हे अतिक्रमण काढण्यासाठी नगर परिषद कर्मचारी व पोलीस गेले होते. या वेळी या व्यावसायिकांनी जेसीबीवर दगडफेक करत अतिक्रमणाला विरोध केला होता. नगर परिषदेने मागील महिन्यात पुणे-नाशिक महामार्गावरील राजगुरुनगर सहकारी बँक ते थिगळस्थळ या ठिकाणी अवैधपणे उभी राहलेली तसेच पाबळ रस्ता वाडा रोड येथील ६० पत्राशेड दुकाने हटवली होती. तसेच महामार्गालगत वाडा रस्ता ते पाबळ रस्ता येथे रस्त्यावर बसणारे २७५ हातगाडीधारक, फुले हार विक्रेते, फळविक्रेते यांना उठविण्यात आले होते. त्यांना पर्यायी जागा नगर परिषदेने सुचवून त्यांचे पुन्हा पुनवर्सन करण्यात आले होते. तसेच खासगी वाहने, दुचाकी वाहनतळ, कुठे उभी करावीत यांचे फलक नगर परिषदेने शहरात लावले होते. उपविभागीय अधिकारी आयुष प्रसाद यांनी राजकीय दबाव झुगारत अतिक्रमणविरोधी धडक कारवाई केली होती. परंतु, नगर परिषदेची पाठ फिरताच काही व्यावसायिकांनी पुन्हा येथे बस्तान बसविण्यास सुरुवात केली. त्यामुळे शहरातील काही संघटनांनी व नागरिकांनी पुन्हा याबाबत तक्रारी केल्या असून, कारवाईची मागणी केली आहे. याबाबत ‘लोकमत’ने वृत्त दिले होते. मंगळवारी आयुष प्रसाद यांनी नगर परिषदेचे मुख्याधिकारी अशोक साबळे, नगराध्यक्ष शिवाजी मांदळे, आस्थापन विभागचे महेश घुमटकर यांच्याबरोबर अतिक्रमणाबाबत चर्चा केली.नगरसेवकांची बैठक बोलावून अतिक्रमणे काढावीत तसेच त्यांना पर्यायी जागा देण्याच्या सूचना केल्या.बंदोबस्त द्या : दोन पथकांची निर्मिती कराअतिक्रमण काढण्यासाठी नगर परिषदेने पोलिसांकडे बंदोबस्त उपलब्ध करून देण्याची मागणी करावी, दोन अतिक्रमणविरोधी पथके स्थापन करून या विभागामार्फत शहरात रोज अतिक्रमणविरोधी कारवाई करावी. तसेच वाहतुकीचा ज्या ठिकाणी खोळंबा होतो, त्या ठिकाणी उभ्या असलेल्या खासगी चारचाकी, दुचाकीवरती पोलिसांना सांगून कारवाई करावी. तसेच केलेल्या कारवाईबाबत २ डिसेंबराला अहवाल द्यावा, अशा सूचना आयुष प्रसाद यांनी केल्या आहेत. पोलिसांनी याला प्रतिसाद दिला असून, त्यांनी नगर परिषदेला पोलीस संरक्षण उपलब्ध करून देण्याची तयारी दर्शवली आहे. त्यानुसार नगर परिषदेने पुन्हा अतिक्रमणविरोधी तयारी सुरू केली असून, कारवाईचे नियोजन करण्यात येणार आहे. अतिक्रमणविरोधी मोहीम राबविली जाणार असल्याने व्यावसायिकांचे पुन्हा धाबे दणाणले आहे.
अतिक्रमणांवर पुन्हा पडणार हातोडा, उपविभागीय अधिकारी आयुष प्रसाद यांचे आदेश
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 29, 2017 2:40 AM