जुन्नर : तालुका कृषी उत्पन्न बाजार समितीच्या जुन्नर येथील मुख्य कार्यालयाच्या आवारातील शेतकरी निवास या इमारतीतील व्यापारी गाळ्यांच्या वाटपाची चौकशी करण्याचे आदेश पणन संचालनालय कार्यालयाकडून देण्यात आले आहेत. समितीचे माजी सभापती संजय काळे व सचिव बाळासाहेब मस्करे यांनी स्वत:च्या पदाचा गैरवापर करून स्वत:चा आर्थिक लाभ व्हावा, यासाठी व्यावसायिक गाळे स्वत:च्या पत्नीच्या नावे गैरमार्गाने लाटले, अशी तक्रार येनेरे येथील विश्वास बारकू घोगरे यांनी पणन संचालक पुणे यांच्याकडे केली होती.घोगरे यांच्या तक्रारीची दखल घेऊन पणन संचालनालय कार्यालयाकडून जिल्हा उपनिबंधक सहकारी यांना या तक्रारींच्यासंदर्भात चौकशीचे आदेश दिले आहेत. जुन्नर येथील गाळ्यांचे वाटप करताना स्थानिक वृत्तपत्रात जाहिरात न देता फक्त जवळच्या माणसांचे अर्ज घेऊन मासिक मीटिंगमध्ये गाळेवाटप केले आहेत. वास्तविक या ठिकाणच्या गाळ्यांना मोठी मागणी असूनदेखील अल्प अनामत रक्कम घेऊन हे गाळे दिले गेले आहेत. संस्थेचे सभापती सचिव स्वत: पदाधिकारी असताना त्यांनी स्वत: लाभात गाळे वाटून घेतले आहेत. हे गाळे पुन्हा संस्थेच्या ताब्यात घ्यावेत, पदाचा गैरवापर करणाऱ्या पदाधिकाऱ्यांना पुढील ६ वर्षे निवडणूक लढविण्यास बंदी घालावी, असे विश्वास घोगरे यांनी केलेल्या तक्रारीत म्हटले होते.(वार्ताहर)
- बेल्हे उपबाजार येथील शेळीबाजारासाठी संचालक गजानन घोडे यांच्या पत्नीचा अर्ज घेऊन बोगस ठरावाने जागा भाड्याने घेऊन बाजार समितीची आर्थिक फसवणूक केल्याबाबतच्या घोगरे यांच्या तक्रार अर्जाची दखल घेऊन चौकशी करण्याचे आदेश पणन संचालनालय कार्यालयाकडून देण्यात आले आहेत. नारायणगाव येथील उपबाजारातील गाळेवाटपासंदर्भातही घोगरे यांनी तक्रार केली आहे.