पुणे : शैक्षणिक संस्थांच्या १०० मीटर परिसरात तंबाखू व तंबाखूजन्य पदार्थ विकण्यास मनाई असूनही त्याचे सर्रास उल्लंघन होत आहे. शालेय व उच्च शिक्षण विभागाकडून दिलेल्या आदेशाला शैक्षणिक संस्थांकडून केराची टोपली दाखविली आहे. तंबाखूविरोधी जागृती करणारे फलक शाळा, महाविद्यालयांच्या आवारात लावणे गरजेचे असताना शहरातील शाळा, महाविद्यालयांनी याकडे दुर्लक्ष केल्याचे दिसून आले आहे. शैक्षणिक संस्थांमध्ये तंबाखू व तंबाखूजन्य पदार्थ विक्री करण्यास बंदी असून त्याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायद्यानुसार दंड वसूल करण्यात येईल, असे फलक शैक्षणिक संस्थांंमध्ये लावणे बंधनकारक आहे. मात्र, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाशी संलग्न अनेक महाविद्यालयांनी फलक लावले नसल्याचे समोर आले आहे. त्यातच अमली पदार्थसेवनाबाबत विद्यापीठांमध्ये व महाविद्यालयांमध्ये जागृती करावी, असे आदेश विद्यापीठ अनुदान आयोगाने (यूजीसी) नुकतेच दिले आहेत. त्याचप्रमाणे शालेय शिक्षण विभागाने या विषयावर परिपत्रक काढण्यापलीकडे काहीही केलेले नाही. त्यामुळे शालेय व महाविद्यालयीन विद्यार्थ्यांमध्ये व्यसनाधीनता वाढण्याची शक्यता निर्माण झाली आहे.सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाशी संलग्न महाविद्यालय व शैक्षणिक संस्थांची संख्या ६५० हून अधिक आहे. सर्व संस्थांमध्ये तंबाखू व तंबाखूजन्य पदार्थ व अमली पदार्थाबाबत जागृती करणे आवश्यक आहे. परंतु, केवळ १०० संस्थांनी याविषयी कार्यवाही केल्याची माहिती समोर आली आहे. विद्यापीठाशी संलग्न अनुदानित व विनाअनुदानित अशा सर्व महाविद्यालयांनी आदेशाचे पालन करणे आवश्यक असताना बहुतांश विनाअनुदानित महाविद्यालयांनी अंमलबजावणीस हरताळ फासला आहे. त्याचप्रमाणे पुणे शहर व उपनगर परिसरातील अनेक शाळा व कनिष्ठ महाविद्यालयांच्या प्रवेशद्वाराजवळ तंबाखूजन्य पदार्थांची विक्री केली जात आहे. परंतु, शालेय शिक्षण विभागाकडूनही शाळांच्या परिसराची तपासणी करण्यात आली नसल्याचे शिक्षणाधिकाऱ्यांनी सांगितले . विद्यार्थ्यांच्या आरोग्याच्या दृष्टीने सर्व महाविद्यालयांनी तंबाखूविरोधी पोस्टर लावून जनजागृती करणे गरजेचे आहे. सर्व महाविद्यालयांनी शासन आदेशाचे पालन करणे बंधनकारक आहे. परंतु, विद्यापीठाशी संलग्न सुमारे १०० महाविद्यालयांनीच याबाबत कार्यवाही केल्याचे दिसून आले आहे. उर्वरित महाविद्यालयांनी तत्काळ अंमलबजावणी करावी. विद्यापीठाने अमली पदार्थसेवनाबाबत जागृती करणारे व्हिडिओ विद्यापीठाच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध केले आहेत. तसेच यूजीसीकडून वेळोवेळी दिलेल्या सूचनांनुसार विद्यार्थीहिताचे विविध उपक्रम राबविले जात आहेत.- डॉ. संजयकुमार दळवी, संचालक, विद्यार्थी कल्याण मंडळ, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ