पुणे : वादग्रस्त हिरे व्यापारी नीरव मोदी याने पंजाब नॅशनल बँकेच्या केलेल्या कोट्यवधी रुपयांच्या फसवणूक प्रकरणी पुण्यातील कर्जवसुली न्यायाधिकरणाने (डीआरटी) ७,२६१ कोटी रुपये सव्याज परत करण्याचा आदेश शनिवारी दिला. या प्रकरणी हा पहिलाच निकाल आहे.
फसवणुकीची माहिती २०० पानी निकालात दिली आहे. बँकेतर्फे अॅड. सिद्धार्थ मल्होत्रा व अॅड. आर्दीश मजुमदार यांनी बाजू मांडली. मोदीची बाजू मांडण्यासाठी कोणीही उपस्थित नव्हते. बँक व मोदीमध्ये झालेले संवाद बँकेने न्यायाधिकरणात सादर केले. मोदीसह इतरांना वेळ देऊनही त्याचा प्रतिसाद आला नाही. निकाल विरोधात जाईल, म्हणून त्याने समन्सही घेतले नाहीत, असे निरीक्षण न्यायाधिकरणाने नोंदविले. या प्रकरणात बँकेने कर्जवसुली न्यायाधिकरणात धाव घेतली होती. प्रकरणाची जबाबदारी पुण्याच्या कर्जवसुली न्यायाधिकरणाकडे आहे. बँकेने मोदीविरोधात तीन दावे केले आहेत. पहिला दावा ७,0२९ कोटी, दुसरा २३२ कोटी व तिसरा दावा १,७०० कोटी रुपयांचा आहे. यातील २ दाव्यांचा निकाल झाला.परदेशातदेखील नीरव मोदीची मालमत्ता असून, या आदेशानंतर आता मोदी याच्या मालमत्तेची जप्ती, विक्री याबाबतची प्रक्रिया पार पाडण्यात येईल.- श्रीकांत अबूज,निबंधक, न्यायाधिकरण