पुणे : महापालिका आयुक्त कुणाल कुमार यांनी गर्दी होत असेल अशा सर्वच इमारतींचे फायर आॅडिट करून घेण्याचे आदेश काढले आहेत. मात्र हे फायर आॅडिट करायचे कोणी, इमारत मालकाने की महापालिकेच्या अग्निशमन दलाने असा प्रश्न निर्माण झाला आहे.फायर आॅडिट म्हणजे त्या इमारतीची संपूर्ण पाहणी. त्यात विद्युत तारांसह आगीला कारणीभूत ठरतात अशा अनेक घटकांची पाहणी केली जाते. त्याचबरोबर आग लागलीच तर ती आटोक्यात आणण्यासाठी लागणाºया उपकरणांची व्यवस्था आहे किंवा नाही हेही पाहिले जाते. यासाठी तांत्रिक ज्ञान असलेले कर्मचारी आवश्यक आहे. अग्निशमन दलाचे जवान ते काम करू शकणार नाहीत किंवा केले तरी ते व्यवस्थित होणार नाही. याशिवाय या अशा कामाला लागणारे शुल्क कोणी द्यायचे, असाही प्रश्न यात निर्माण झाला आहे.कोरेगाव पार्क, कोंढवा, येरवडा, कल्याणीनगर अशा उपनगरांमध्ये गेल्या काही वर्षांत फार मोठ्या प्रमाणावर व्यावसायिक, तसेच निवासी इमारती झाल्या आहेत. त्या इमारतींच्या टेरेसवर असे पब सुरू करण्यात येतात. तिथे रोज गर्दी असते. हुक्का पार्लरही असतात. तिथे विस्तवाचा वापर केला जातो. त्यातील एखादी ठिणगी पडली तरी आग लागू शकते. तसे होऊ नये याची काळजी घेतली जात नाही. आग लागलीच तर त्यातून वाचण्यासाठी म्हणून एखादा मार्गही नसतो. बांधकाम करतानाच तशी व्यवस्था करणे गरजेचे असते.टेरेस पब आणि हुक्का पार्लर यांच्या एकूणच सगळ्याचबाबतीत गडबड आहे. अनेक प्रकारचे परवाने ते सुरू करताना घ्यावे लागतात. त्यात पोलीस, महापालिका, आरोग्य, अन्न व औषध प्रशासन, करमणूक विभाग अशी विविध सरकारी खाती आहेत. त्या सर्वांचे ना-हरकत प्रमाणपत्र असेल तरच ते पार्लर किंवा पब अधिकृत समजला जातो. ना-हरकत दाखले मिळवण्यापेक्षा बहुसंख्य पबमालकांनी व हुक्का पार्लरवाल्यांनी ते अनधिकृत सुरू करणेच पसंत केले आहे. संबंधित अधिकाºयांना याची कल्पना असते, मात्र आर्थिक तडजोडींमध्ये या सगळ्याकडे दुर्लक्ष केले जाते.उपमहापौरांची कारवाईची मागणीउपमहापौर डॉ. सिद्धार्थ धेंडे यांनी यासंदर्भात महिनाभरापूर्वीच आयुक्तांना एक पत्र दिले होते व अशा अनधिकृत पब व हुक्का पार्लरचा शोध घेऊन त्यांच्यावर कडक कारवाई करण्याची मागणी केली होती. मात्र त्याकडे दुर्लक्षच करण्यात आले. आता त्यांनी तसेच शिवसेनेचे नगरसेवक बाळा ओसवाल, महाराष्टÑ नवनिर्माण सेना यांनीही मुंबईतील घटनेच्या पार्श्वभूमीवर पोलीस तसेच महापालिका आयुक्तांकडे सर्व पब व हुक्का पार्लर बंद करावेत, अशी मागणी केली आहे.हॉटेलच्या नावाखाली परवाने!महापालिकेतील काही वरिष्ठ अधिकाºयांबरोबर चर्चा केली असता त्यांनी परवाना पद्धतीमध्ये अनेक दोष असल्याची माहिती मिळाली. हॉटेल अशा नावाखाली परवाना घेऊन हे सर्व उद्योग अनधिकृतपणे केले जात आहेत. निवासी इमारतींमध्येही बदल करून अनेकांनी असे पब सुरू केले आहेत. शहरातील अशा पबची संख्या काही हजारांमध्ये तरी असेल, असा अंदाज या अधिकाºयांनी व्यक्त केला. कोरेगाव पार्क परिसरात तर अगदी शेजारी शेजारी असे पब आहे. तेथील रहिवाशांनी अनेकदा तक्रारी करूनही पोलिसांकडून दुर्लक्ष केले जाते. मध्यंतरी आंदोलनही करण्यात आले होते, मात्र त्याचाही काही उपयोग झाला नाही.
महापालिका आयुक्तांचे आदेश : सर्वच इमारतींचे फायर आॅडिट
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 31, 2017 5:13 AM