स्थापत्य कलेचा उत्कृष्ट नमुना असलेल्या पुरातन कुकडेश्वर मंदिराचा जिर्णोद्धार करण्यासाठी विघ्नहर सहकारी साखर कारखान्याने निधी उपलब्ध करून दिला होता. त्यानुसार सन २०१२ मध्ये मंदिराच्या जिर्णोद्धाराचे काम पूर्ण झाले. मात्र पुरातत्व विभागाने दिलेल्या ड्रॉइंगमध्ये कळसाचा समावेश नसल्याने हे काम करता आले नव्हते. कळसाशिवाय मंदिर अपूर्ण असल्याची जनभावना असल्याने कळस उभारण्याची मागणी सातत्याने केली जात होती. विघ्नहर सहकारी साखर कारखान्याने त्यासाठी निधी उपलब्ध करून देण्याची तयारी दर्शवली होती. परंतु सातत्याने पाठपुरावा करूनही पुरातत्व विभागाकडून कळसाचे ड्रॉइंग व खर्चाचे अंदाजपत्रक मिळत नव्हते.
या संदर्भात खासदार डॉ. कोल्हे व आमदार अतुल बेनके यांनी राज्यमंत्री आदिती तटकरे यांच्या दालनात आयोजित बैठकीत पुरातन कुकडेश्वर मंदिराचा कळस उभारण्यासाठी परवानगी देण्याची मागणी राज्याच्या पुरातत्व व वस्तुसंग्रहालये संचालनालयाचे संचालक डॉ. गर्गे यांच्याकडे केली होती. त्याचबरोबर खासदार डॉ. कोल्हे यांनी संचालक डॉ. गर्गे यांना रीतसर पत्र पाठवून परवानगी देण्याची मागणी केली होती.
खासदार डॉ. कोल्हे यांच्या पत्राची तातडीने दखल घेऊन संचालक डॉ. गर्गे यांनी सहायक संचालक, पुरातत्व विभाग, पुणे यांना कुकडेश्वर मंदिराचा कळस उभारण्यासाठी तज्ज्ञ वास्तुविशारदाकडून बांधकामाचा सविस्तर आराखडा व अंदाजपत्रक तयार करून मान्यतेसाठी सादर करण्याचे आदेश दिले आहेत.
पुरातत्व विभागाच्या आदेशामुळे पुरातन कुकडेश्वर मंदिराचा कळस बसविण्याच्या आशा पल्लवित झाल्या असून अनेक वर्षांपासूनची कळसासह कुकडेश्वर मंदिर पूर्ण व्हावे ही जनभावना फलद्रूप होईल, अशी अपेक्षा खासदार डॉ. कोल्हे यांनी व्यक्त केली आहे.