भोर : ऐन टंचाईच्या काळात डिझेलचा आभाव, अपुरे कर्मचारी आणि आहे त्या कर्मचाऱ्यांची मनमानी यामुळे भोर तालुक्यातील यांत्रिक विभागाकडून गावागावांतील विंधन विहिरींची (हातपंप) दुरुस्ती होत नसल्याने टंचाईत वाढ होत आहे. यामुळे पंचायत समितीच्या यांत्रिक विभागाच्या कामकाजाबद्दल नागरिक नाराजी व्यक्त करीत आहेत. त्यामुळे संबंधितांवर कारवाई करण्याची मागणी होत असल्याची ‘लोकमत’ने बातमी प्रसिद्ध केली होती. याची तातडीने दखल घेऊन भोर पंचायत समितीचे गटविकास अधिकारी सभापती, उपसभापती व सदस्यांनी कर्मचाऱ्यांना चांगलेच धारेवर धरून सर्व हातपंपांची दुरुस्ती करण्याचे आदेश दिल्याने निम्मे हातपंप दुरुस्त झाले असून, दुरुस्तीचे काम सुरू आहे.भोर पंचायत समितीच्या ग्रामीण पाणीपुरवठा विभागांतर्गत असलेल्या यांत्रिक (हातपंप) विभागाकडून तालुक्यातील विंधन विहिरी खोदणे, त्यांची देखभाल-दुरुस्ती करणे ही कामे केली जातात. तालुक्यातील १९७ गावे आणी वाड्या-वस्त्यांपैकी सुमारे ५८० गावे व वाड्यांत हातपंप बसविण्यात आले आहेत. यात नीरा-देवघर व भाटघर धरण या डोंगरी भागातील टंचाईग्रस्त गावांचा अधिक प्रमाणात समावेश आहे. या हातपंपाच्या माध्यमातून या गावातील पाणीटंचाई तातपुरत्या स्वरूपात कमी करण्याचा प्रयत्न केला जातो. या हातपंपाच्या देखभाल-दुरुस्तीचा खर्च करण्याचे प्रत्येक ग्रामपंचायतीकडून वर्षाला एक हजार रुपये घेतलेले जातात. मात्र, अनेक ग्रामपंचायती दोन-दोन वर्षे पैसे भरत नाहीत. अनेक पैसे वेळेत देतात; मात्र यांत्रिक विभागाच्या मनमानी कारभारामुळे अनेक हातपंप धूळ खात पडून आहेत त्यांची दुरुस्तीच होत नाही. ‘लोकमत’ने याबाबत बातमी प्रसिद्ध केली होती. त्याची दखल घेऊन भोर पंचायत समितीच्या सभापती मंगल बोडके, उपसभापती लहू शेलार, पंचायत समिती सदस्य श्रीधर किंद्रे, दमयंती जाधव, गटविकास अधिकारी संजीव गायकवाड यांनी पाणीपुरवठा विभाग व यांत्रिक विभागाचे अधिकारी व कर्मचाऱ्यांची बैठक घेऊन हातपंप दुरुस्तीसाठी डिझेलसह सर्व सुविधा पुरवून नादुरुस्त असणारे हातपंप त्वरित दुरुस्त करण्याचे आदेश देण्यात आले होते. (वार्ताहर)जिल्हा परिषदेकडे कर्मचारी देण्याचा प्रस्तावदरम्यान, तालुक्यात पाणीटंचाईत वाढ झाली आहे. या विषयावर भोर पंचायत समितीत पाणीपुरवठा व यांत्रिक विभागाची बैठक घेऊन टंचाई आराखडा जिल्हा परिषदेला पाठविला आहे. तर, हातपंप दुरुस्तीसाठी गाडीला लागणाऱ्या डिझेलचा पुरवठा व इतर सुविधा देण्यात आल्या आहे.हातपंप त्वरित दुरुस्त करण्याच्या सूचना यांत्रिक विभागाला दिल्या आहेत. या विभागात कर्मचारी कमी आहेत. हे कर्मचारी देण्याची मागणी जिल्हा परिषदेकडे करण्यात आल्याचे गटविकास अधिकारी संजीव गायकवाड व सभापती मंगल बोडके यांनी सांगितले.दुरुस्तीचे काम आठवडाभरात पूर्ण होणारभोरच्या यांत्रिक विभागाला हातपंप दुरुस्त करण्यासाठी लागणारे डिझेल व इतर साहित्य देण्यात आले आहे. यामुळे यांत्रिक विभागाकडून बालवडी, रायरी, गवडी, शिरवली हि.मा., वेळु येथील हातपंप दुरुस्त करण्यात आले आहेत.तालुक्यातील कुंड, अशिंपी, उंबारडे, धांगवडी तेलवडी, वेळू, बारे येथील हातपंप दुरुस्त करण्याचे काम पुढील आठवडाभरात पूर्ण होईल.यामुळे थोड्याफार प्रमाणात टंचाई दूर होण्यास मदत होईल, असे पंचायत समितीचे उपसभापती लहू शेलार व पंचायत समिती सदस्य श्रीधर किंद्रे यांनी सांगितले.
हातपंपांची दुरुस्ती करण्याचे आदेश
By admin | Published: March 31, 2017 2:20 AM