लोकमत न्यूज नेटवर्क
पुणे : शहरात दिवसाला साडेतीन हजारांच्या आसपास होणारी कोरोनाबाधितांची वाढ व ३३ हजारांपर्यंत पोहोचलेली सक्रिय रुग्णसंख्या, यामुळे पुणे महापालिकेने शहरातील मोठ्या खासगी रुग्णालयांमधील ८० टक्के खाटा (बेड) राखीव करण्याचा निर्णय घेतला आहे़
या निर्णयामुळे सध्या कोरोनाबाधितांसाठी राखीव असलेल्या ६ हजार ७२८ एकूण खाटांमध्ये आणखी दोन हजारापर्यंत वाढ होण्याची शक्यता निर्माण झाली आहे़ विभागीय आयुक्त कार्यालयाच्या कोविड रुग्णांसाठी राखीव खाटा दाखविणाऱ्या १०० रुग्णालयांच्या यादीतील खासगी रुग्णालयांमध्येही दोन हजार खाटांची यामुळे वाढ होणार आहे़ यात आपत्ती व्यवस्थापन कायद्यानुसार प्रत्येक खासगी रूग्णालयाने ऑपरेशन बेडच्या ८० टक्के बेड तत्काळ कोरोनाबाधितांच्या उपचारासाठी उपलब्ध करून देण्याबाबतचे आदेश देण्यात आले आहेत़
सदर आदेशात महापालिकेने उर्वरित २० टक्के बेडवर (खाटांवर) रुग्णालयात उपचार घेत असलेल्या नॉन-कोविड (अन्य आजाराच्या रुग्णांना) रुग्णांवर हलविण्यात यावे़ तसेच येथे केवळ अतितातडीच्या नॉन कोविड रुग्णांवरच उपचार करावेत असेही स्पष्ट केले आहे़
कोरोनाबाधितांसाठी राखीव करण्यात येणाऱ्या ८० टक्के खाटांमध्ये ऑक्सिजन युक्त, आयसीयु (विना व्हेंटिलेटर), व्हेटिंलेटर आयुसीयू, या प्रकारचे बेड देताना ते अधिकाधिक प्रमाणात कसे देता येतील यासाठीची प्रयत्न करावेत व ते सेवेत लागलीच कार्यान्वित करावेत असे आदेश महापालिका आयुक्त विक्रम कुमार यांनी सोमवारी शहरातील सर्व खासगी रुग्णालयांना दिले आहेत़
-------------------------------------