पुणे : महापालिकेत महापौर आणि उपमहापौर पदाच्या निवडीनंतर लवकरच अन्य पदासाठी देखील निवडणूक होणार असल्याची चर्चा होती. त्यानुसार गुरुवार (दि.२८) रोजी सत्ताधारी भाजपने सभागृह नेते श्रीनाथ भिमाले यांच्यासह स्थायी समिती अध्यक्ष सुनिल कांबळे आणि पीएमपीएमपीचे संचालक सिध्दार्थ शिरोळे यांना त्यांच्या पदाचे राजीनामे देण्याचे आदेश दिले. कांबळे आणि शिरोळे हे आमदार म्हणून निवडून आल्याने पक्षाने हा निर्णय घेतला आहे. महापालिकेतील महापौर आणि उपमहापौरपदाच्या निवडणूका नुकत्याच पार पडल्या. त्यामुळे महापालिकेतील अन्य पदाधिकारी बदलणार का याबाबत उत्सुकता होती. त्यातच नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणूकीत स्थायी समिती अध्यक्ष सुनिल कांबळे हे पुणे कॅन्टोमेन्ट मतदारसंघातून तर पीएमपीएमपीचे संचालक असलेले सिध्दार्थ शिरोळे हे शिवाजीनगर मतदारसंघातून विजयी झाले होते. त्यामुळे एका व्यक्तीकडे तीन पेक्षा अधिक पदे भाजप ठेवणार का असा प्रश्न होता. त्यानुसार आता राज्यातील सत्ता गमाविल्यानंतर भाजपने भिमाले, कांबळे आणि शिरोळे यांना त्यांच्याकडील पदांचे राजीनामे देण्याचे आदेश गुरूवारी दिले. दरम्यान शिरोळे यांनी सायंकाळी शहर सरचिटणीस गणेश बिडकर यांच्याकडे त्यांच्या राजीनामा सुपुर्द केला. तर सभागृह नेते भिमाले हे शहराबाहेर असल्याने रात्री पुण्यात आल्यानंतर राजीनामा देणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. तर स्थायी अध्यक्ष कांबळे यांनी याबाबत आपल्याला राजीनाम्याबाबत सुचना मिळाल्या नसल्याचे स्पष्ट केले.------------------------ विधानसभा निवडणुकीनंतर महापालिकेत महापौर आणि उपमहापौर पदाची निवडणूक घेऊन नविन सदस्यांची निवड करण्यात आली. आता अन्य पदासाठी देखील लवकरच निवडणूक घेण्यात येणार आहे. यामुळेच महापालिकेतील सभागृह नेते, स्थायी समिती अध्यक्ष आणि पीएमपी संचालक यांना त्यांचा पदाच्या राजीनामे देण्याच्या सुचना देण्यात आले आहेत. हे राजीनामे घेऊन येत्या मंगळवारी त्यावर निर्णय घेतला जाईल.- माधुरी मिसाळ, भाजप शहराध्यक्षा व आमदार
भिमाले, कांबळे आणि शिरोळे यांना पदांचे राजीनामे देण्याचे आदेश : माधुरी मिसाळ
By ऑनलाइन लोकमत | Published: November 28, 2019 8:42 PM
कांबळे आणि शिरोळे हे आमदार म्हणून निवडून आल्याने पक्षाने हा निर्णय घेतला..
ठळक मुद्दे पुढील पद निवडी संदर्भांत मंगळवारी निर्णय