पुणे : बाणेर येथील अपघातात माय-लेकींच्या मृत्यूस कारण ठरल्याच्या प्रकरणात मोटारचालक महिलेवर भारतीय दंडसंहितेच्या कलम ३०४ (सदोष मनुष्यवध) नुसार कलम लावण्यासाठी पोलिसांनी केलेल्या अर्जावर बचाव पक्षाने २५ एप्रिल रोजी लेखी स्वरूपात म्हणणे सादर करावे, असा आदेश न्यायालयाने दिला. प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी समता चौधरी यांच्या न्यायालयात या प्रकरणाची सुनावणी सुरू आहे. २६ एप्रिल रोजी यावर सरकारी आणि बचाव पक्षाचा युक्तिवाद होणार आहे. १७ एप्रिल रोजी दुपारी ३ च्या सुमारास रस्ता ओलांडण्यासाठी दुभाजकावर उभ्या असलेल्या पाच जणांना मोटारीने धडक दिली होती. त्यामध्ये माय-लेकीचा मृत्यू झाला. अन्य तिघे जखमी झाले. या प्रकरणी सुजाता जयप्रकाश श्रॉफ (रा. शिवाजीनगर) यांना पोलिसांनी अटक केली. त्या वेळी त्यांच्यावर भारतीय दंड संहिता कलम ३०४ (अ) (निष्काळजीपणे वाहन चालवून मृत्यूस कारण होणे) कलमानुसार गुन्हा दाखल करण्यात आला होता. हे कलम जामीनपात्र असल्यामुळे अवघ्या काही तासांत सुजाता यांना जामीन मिळाला. त्याचे पडसाद सर्वत्र उमटले होते.
बचाव पक्षाला म्हणणे मांडण्याचे आदेश
By admin | Published: April 24, 2017 5:07 AM