पुणे : राज्यात कोविडचा प्रादुर्भाव वाढल्याने शासनाने शंभर टक्के ऑक्सिजनचा वापर हा फक्त आरोग्यासाठी करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यानुसार जिल्ह्यातील सर्व उत्पादकांना लिक्विड ऑक्सिजन फक्त मेडिकल ऑक्सिजन तयार करण्यासाठीच करून देण्यात आली आहे. यामुळेच जिल्ह्यातील ऑक्सिजन उत्पादक आणि रिफ्लेक्टर्स यांच्याकडील औद्योगिक वापराचे सर्व ऑक्सिजन सिलिंडर सील करण्याचे आदेश जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख यांनी सोमवारी काढले. ऑक्सिजनचा गैरवापर टाळण्यासाठी हे आदेश काढण्यात आल्याचे अतिरिक्त जिल्हाधिकारी विजयसिंह देशमुख यांनी स्पष्ट केले.
शहरी भागासोबतच ग्रामीण भागात देखील मोठ्या प्रमाणात कोरोना रुग्णांची संख्या वाढत असल्याने दररोज ऑक्सिजनची मागणी देखील वाढत आहे. या पार्श्वभूमीवर सर्व ऑक्सिजन उत्पादक आपल्या क्षमतेपेक्षा ५-१० टक्के म्हणजे ११० क्षमतेने निर्मिती करून देखील मागणीच्या तुलनेत उत्पादन कमी पडत आहे. यामुळेच उपलब्ध होणारा ऑक्सिजनचा वापर प्रचंड काटकसरीने करण्यासाठी जिल्हा प्रशासन विविध उपाययोजना राबवीत आहे. यात शहर आणि जिल्ह्यातील सर्व रुग्णालयांना त्यांच्याकडील ऑक्सिजन वापराचे ऑडिट करण्याचे आदेश देण्यात आल्यानंतर आता मेडिकल ऑक्सिजनची गरज भागवण्यासाठी विविध उपाययोजना केल्या जात आहेत. जिल्हाधिकाऱ्यांनी औद्योगिक क्षेत्रातील ऑक्सिजन उत्पादकांना त्यांच्याकडे प्राप्त होणाऱ्या लिक्विड ऑक्सिजनमधून फक्त मेडिकल ऑक्सिजन तयार करण्याचे आदेश दिले आहेत. तरीदेखील काही उत्पादकांकडून औद्योगिक वापरासाठी ऑक्सिजन तयार करून त्याचा पुरवठा कंपन्यांना केला जात असल्याचे निदर्शनास आले.
ऑक्सिजन सिलेंडर सील करण्यासाठी उद्योग विभागाचे सहसंचालक सदाशिव सुरवसे यांच्या नेतृत्वाखाली त्यासाठी विशेष पथक स्थापन करण्यात आले. ऑक्सिजनचे रिफिलिंग करणाऱ्या उद्योजकांकडे असणारे सिलेंडर आता मेडिकल ऑक्सिजन वापरासाठी उपयोगात आणले जातील. अ
ऑक्सिजन वाहतुकीसाठी नायट्रोजनचे टँकर ताब्यात
पुणे जिल्ह्यासाठी चाकण, पुरंदर ऑक्सिजन उत्पादक कंपन्यांकडून ऑक्सिजन पुरवठा करण्याऐवजी शासनाने कर्नाटक येथील बेल्लारी आणि रायगड जिल्ह्यातील तळोजा येथून ऑक्सिजन उचलण्यास सांगितले. यामुळे पुणे जिल्ह्यासाठी ऑक्सिजन वाहतुकीसाठी जास्तीचे टँकरची गरज निर्माण झाली. यामुळेच अखेर जिल्हा प्रशासनाने नायट्रोजनची वाहतूक करणाऱ्या दोन टँकरमध्ये माॅडिफिकेशन करून हे टँकर ऑक्सिजन वापरासाठी उपयोग करण्याचा निर्णय घेण्यात आला. रुग्णालयातील ऑक्सिजन वापराचे ऑडिट होणार असून त्यासाठी डॅशबोर्डदेखील तयार केला जाणार आहे.
- विजयसिंह देशमुख, अतिरिक्त जिल्हाधिकारी