पुणे : दुचाकी वाहनांचा प्रवासी वाहतूकीसाठी बेकायदेशीरपणे वापर करण्यासाठी तयार करण्यात आलेले बेकायदेशीर अॅप तातडीने बंद करावेत, असा आदेश प्रादेशिक परिवहन अधिकार्यांनी प्रवासी वाहतूक करणार्या उबेर आणि आमिगो बाय झूमकर कंपन्यांना दिला असून त्यांनी त्यासाठी वेळ मागून घेतला आहे.
दुचाकी वाहनांचा प्रवासी वाहतूकीसाठी होत असलेल्या बेकायदेशीर वापराबाबत महाराष्ट्र रिक्षा सेना चे अध्यक्ष डॉ. केशव नाना क्षीरसागर यांनी प्रादेशिक परिवहन विभागाला पत्र देऊन जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन केले होते. परिवहन विभागाने सायबर पोलिसांना याबाबत पत्र दिले होते. उबेर, आमिगो बाय झूमकार, रॅपीडो व ओला कंपनीकडून दुचाकी वाहनांचा प्रवासी वाहतूकीसाठी अॅपचा बेकायदेशीरपणे वापर होत आहे. व्यावसायिक तत्वावर दुचाकी वाहनांचा वापर करावयाचा असल्यास त्यासाठी परवानगी घेण्याची आवश्यक असताना या कंपन्यांनी परवानगी घेतली नव्हती. परिवहन विभागाने अशा प्रकारचा कुठलाही परवाना जारी केलेला नाही. खासगी कंपन्या त्यांचे अॅपवर आधारीत बुकींग घेऊन खासगी दुचाकी वाहनांद्वारे बेकायदेशीर प्रवासी व्यवसाय करीत आहेत. तसेच या कंपन्या अनाधिकृतपणे ऑनलाइृन वेवसाईट व अॅपच्या आधारे या बेकायदेशीर प्रवासी सेवा पुरवित आहेत. या पार्श्वभूमीवर या बेकायदेशीर वेबसाईट व अॅप सर्व्हिसचे ऑनलाईन प्लॅटफॉर्म त्वरीत बंद करावेत व त्यावर योग्य ती कायदेशीर कारवाई करावी, असे पत्र प्रादेशिक परिवहन कार्यालयाने सायबर पोलिसांना पाठविले होते.
या पत्राची दखल घेऊन सहायक पोलीस आयुक्त विजय पळसुले यांनी आज एका बैठकीचे आयोजन केले होते. त्यात उप प्रादेशिक परिवहन अधिकारी संजय ससाणे, सहायक प्रादेशिक परिवहन अधिकारी युवराज पाटील, पवन नवाळे, मोटार वाहन अभियोक्ता वाडेकर तसेच उबेर व आमिगो बाय झूमकर कंपनीचे प्रतिनिधी उपस्थित होते. अन्य कंपन्यांचे प्रतिनिधी बैठकीला आले नाहीत.