पुणे : अल्पावधीतच लोकप्रिय झालेल्या येवले चहाचे कोंढव्यातील उत्पादन केंद्र बंद ठेवण्याचे आदेश अन्न आणि औषध प्रशासनाचे (एफडीए) सह आयुक्त एस. एस. देशमुख यांनी दिले आहेत. येवले चहा प्यायल्याने पित्त होत नाही. तसेच, चहासाठी मिनरल वॉटर वापरले जात असल्याचा चुकीचा दावा त्यांना भोवला असून, कर्मचाऱ्यांची आरोग्य तपासणी, पँकबंद मालावर कोणती माहिती नसणे अशा विविध नियमांचे उल्लंघन केल्याने पुढील आदेश येईपर्यंत उत्पादन केंद्र बंद ठेवण्याचा आदेश दिला आहे. मात्र, शहरातील विविध चहा केंद्र मात्र, माल असेपर्यंत सुरु राहणार आहेत.
येवले चहामधे मेलानाईटचा वापर केला जात असल्याचे वृत्त पसरले आहे. त्या पार्श्वभूमीवर एफडीएने कोंढव्यातील येवले फूड प्रॉडक्ट येथे तपासणी केली. चहा पावडर, साखर, चहा मसाला यांचे नमुने आणि सहा लाख रुपयांचा साठा संशयावरुन जप्त केला आहे. तसेच, अन्नपदार्थांचे नमुने तपासणीसाठी प्रयोगशाळेत पाठविण्यात आले आहेत. येत्या तीन आठवड्यात प्रयोगशाळेच्या अहवालानंतर पुढील कार्यवाही करण्यात येईल.
अन्न सुरक्षा मानदे कायदा २००६ नुसार पॅकबंद केलेली चहा पावडर, साखर आणि चहा मसाल्याच्या पाकिटावर कोणताही उल्लेख नाही. त्यामुळे त्यात नक्की कोणता अन्नपदार्थ किती प्रमाणत आहे, हे समजू शकत नाही. उत्पादन प्रक्रियेवर लक्ष ठेवण्यासाठी योग्य शिक्षण येतलेल्या व्यक्तीची नेमणूक केलेली नसणे, अन्न पदार्थांची प्रयोगशाळेतून तपासणी न करणे, कर्मचाऱ्यांची वैद्यकीय तपासणी केल्याचे प्रमाणपत्र उपलब्ध नसणे, तसेच उत्पादनाच्या ठिकाणी पेस्ट कंट्रोल केले नसल्याची त्रुटी आढळली आहे.
येवले चहाची वृत्तवाहिनीवर जाहीरात प्रसिद्ध केली जाते. त्यात येवले चहा प्यायल्यावर पित्त होत नसल्याचा दावा केला जातो. तसेच, चहासाठी मिनरल वॉटर वापरले जाते. ही जाहीरात दिशाभूल करणारी असल्याचे एफडीएने म्हटले आहे. या प्रकरणी एफडीएचे सहायक आयुक्त संजय नारागुडे यांनी नोटीस बजावली आहे. तसेच, अॅडर्व्हटायझिंग स्टॅण्डर्ड कौंसिल आॅफ इंडियाकडे देखील तक्रार नोंदविल्याचे एफडीएच्या अधिकाºयांनी सांगितले. अन्नसुरक्षा अधिकारी इम्रान हवालदार व रमाकांत कुलकर्णी यांच्या पथकाने ही कारवाई केली. ...म्हणून मिनरल वॉटरचा दावा ठरला खोटाबाजारात मिळणारे विविध कंपन्यांच्या पाण्याला मिनरल वॉटर म्हणण्याची प्रथा रुढ झाली आहे. मात्र, कायद्यात मिनरल वॉटर आणि बाटलीबंद पाणी यांची व्याख्या वेगळी आहे. गंगोत्रीच्या खोऱ्यामधील नैसर्गिक पाण्याला मिनरल वॉटर म्हटले जाते. त्यावर कोणतीही प्रक्रिया केलेली नसते. निसर्गत:च ते पाणी शुद्ध असते. इतर, ठिकाणचे बाटलीबंद पाणी हे प्रक्रियायुक्त असते, असे सह आयुक्त संजय नारागुडे म्हणाले.