पुणे : खेड ते सिन्नर या दरम्यानच्या रस्त्याचे चौपदरीकरणासाठी राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाने झाडे तोडली होती. त्याबदल्यात झाडे लावली गेली नाहीत. त्यामुळे आता राष्ट्रीय हरित लवादाने आदेश दिला असून, तोडलेल्या झाडांच्या दहापट म्हणजे २३ हजार ७३० झाडे लावण्यात येणार आहेत. झाडे लावण्यासाठी सामाजिक वनीकरणाला २ कोटी ७१ लाख रूपये देण्याचा आदेश दिला आहे. परंतु, प्रत्यक्षात ८ कोटी रूपये देण्याची गरज आहे, अशी मागणी सामाजिक कार्यकर्ते गणेश बोऱ्हाडे यांनी केली आहे.
खेड ते सिन्नर (राष्ट्रीय महामार्ग क्रमांक-५०) दरम्यान चौपदरीकरणासाठी २०१३ मध्ये आड येणारी झाडे तोडण्याची परवानगी राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाने मागितली होती. संगमनेर तहसिलदार यांच्या अहवालानुसार उपविभागीय अधिकारी संगमनेर, यांनी ८ जानेवारी २०१४ ला आदेश काढून २३७३ झाडे तोडण्यास परवानगी दिली. त्यात बाभूळ, बोर, निलगिरी, लिंब, बदाम, पिंपळ, वड, सीताफळ, निर्गुडी, करंजी, शिसव, गुलमोहर, रायवळ, उंबर, इत्यादी प्रकारच्या झाडांचा समावेश होता. तसेच एका झाडामागे दहा झाडे लावणे बंधनकारक होते. ही वृक्षलागवड २०१४ मध्येच करणे अपेक्षित होते. पण ते अद्याप रखडले आहे. त्यामुळे गणेश बोऱ्हाडे यांनी उपविभागीय अधिकाऱ्यांच्या वृक्षलागवडीच्या आदेशाची अंमलबजवणी केली जात नसल्याने राष्ट्रीय हरित लवादाकडे याचिका दाखल केली होती. त्यावर आता नुकतीच सुनावणी झाली. त्यामध्ये वरील आदेश देण्यात आला आहे. पुढील सुनावणी २१ नोव्हेंबर रोजी होणार आहे.
आताच्या सुनावणीत खेड-सिन्नर दरम्यान तोडलेल्या झाडांच्या बदल्यामध्ये वृक्षलागवड करण्यासाठी राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाने सामाजिक वनीकरण विभागाला २ कोटी ७१ लाख रुपये देण्याचा आदेश खंडपीठाने दिला आहे. पण निधी नसल्याने काम रखडले आहे.
पुणे जिल्ह्यातील आंबेगाव, राजगुरूनगर व जुन्नर तालुक्यातून रस्ता गेलेला आहे. तिथेही झाडे लावणे आवश्यक आहे. दहा वर्षे झाली तरी झाडे लावली नाहीत. त्याविषयी आम्ही हरित लवादाकडे भांडत आहोत. अजून पूर्ण निकाल लागलेला नाही. येत्या २१ नोव्हेंबर रोजी पुन्हा सुनावणी होणार आहे. - गणेश बोऱ्हाडे, सामाजिक कार्यकर्ते