पुणे विभागाची आकडेवारी : पहिल्या लाटेच्या तुलनेत दुसऱ्या लाटेत प्रमाण घटले
लोकमत न्यूज नेटवर्क
पुणे : पहिल्या लाटेच्या तुलनेत दुसऱ्या लाटेत कोरोनाचा संसर्ग अतिशय झपाट्याने पसरला. कोरोनाबाधित रुग्णांची संख्याही अनेक पटींनी वाढली. दुसऱ्या लाटेच्या उद्रेकाचा परिणाम प्रत्यारोपणावरही झालेला दिसत आहे. १ जानेवारी ते ३१ मे या पाच महिन्यांच्या कालावधीत पुणे विभागात ९ मेंदूमृत दात्यांकडून अवयवदान झाले, तर १९ अवयव प्रत्यारोपण शस्त्रक्रिया पार पडल्या. नवीन वर्षात आतापर्यंत एकही हृदय प्रत्यारोपण झालेले नाही.
कोरोनाच्या पहिल्या लाटेत अवयवदानाची प्रक्रिया संथ झाली होती. पहिली लाट ओसरल्यावर नवीन वर्षात प्रत्यारोपणाचे प्रमाण हळूहळू वाढत होते. जानेवारी २०२१ मध्ये किडनी प्रत्यारोपणाच्या ६ शस्त्रक्रिया पार पडल्या. फेब्रुवारीमध्येही अवयवदान आणि प्रत्यारोपणाची प्रक्रिया व्यवस्थित सुरू होती. मार्चमध्ये कोरोना रुग्णसंख्या जसजशी वाढू लागली, त्याप्रमाणे अवयवदानाची प्रक्रिया संथ झाली. जून ते डिसेंबर २०२० या काळात २४ मेंदूमृत दात्यांनी अवयवदान केले.
ब्रेन डेड व्यक्तीच्या अवयवांचे प्रत्यारोपण कसे करायचे, याबाबत कोरोना काळात इंडियन सोसायटी ऑफ नेफ्रॉलॉजी आणि इंडियन सोसायटी ऑफ ऑर्गन ट्रांसप्लान्ट यांच्याकडून मार्गदर्शक तत्त्वे तयार करण्यात आली. कोरोना काळातील नियमावलीचे पालन करून प्रत्यारोपण करण्यात आले. प्रत्यारोपण शस्त्रक्रियांचे प्रमाण कमी झाल्याने झेटटीसीसीकडील प्रतीक्षा यादीही वाढली आहे.
-------
दुसऱ्या लाटेत कोरोनाचा प्रसार मोठ्या प्रमाणात वाढला. सर्वत्र भीतीदायक परिस्थिती निर्माण झाली होती. जानेवारी, फेब्रुवारी या दोन महिन्यांमध्ये बऱ्यापैकी प्रत्यारोपण शस्त्रक्रिया झाल्या. मार्च-एप्रिलमध्ये प्रमाण घटले. अता हळूहळू अवयवदान चळवळीला पुन्हा वेग येत आहे.
- आरती गोखले, समन्वयक, विभागीय अवयव प्रत्यारोपण समन्वय समिती
------
अवयवदान
(१ जानेवारी ते ३१ मे)
मेंदूमृत दाते : ९
मूत्रपिंड - १०
यकृत - ९
ह्रदय - १
फुफ्फुसे जोडी - १
स्वादुपिंड - १
-------------------
एकूण : २३
---------
प्रत्यारोपण : २० (१ जानेवारी ते ३१ मे)
मूत्रपिंड - ९
यकृत - ९
ह्रदय - ०
मूत्रपिंड स्वादुपिंड - १
----------
प्रत्यारोपण (जून ते डिसेंबर २०२०)
मेंदूमृत दाते : २४
मूत्रपिंड : २४
यकृत : २४
हृदय : ३
मूत्रपिंड स्वादुपिंड : ५
----
अवयवदानाबाबत जनजागृती व्हावी, प्रत्यारोपणाच्या माध्यमातून रुग्णांना जीवदान मिळावे, यासाठी झेडटीसीसी सातत्याने प्रयत्नशील आहे. गेल्या दोन-तीन वर्षांपासून अवयवदानाची संख्या ७० पर्यंत वाढली आहे.
- डॉ. शीतल धडफळे, सचिव, विभागीय प्रत्यारोपण समन्वय समिती