लोकमत न्यूज नेटवर्क
पुणे : ऊसतोडणीनंतर शिल्लक राहणाऱ्या पाचटापासून सेंद्रिय खत तयार करण्यात येणार आहे. यासाठी साखर कारखान्यांचे अर्थसाह्य घेण्याची सूचना उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी कृषी विभागाला केली आहे.
ऊसतोडणीनंतर अजुनही काही शेतकरी शिल्लक पाचट पेटवून देतात. त्यातून पर्यावरण प्रदूषण तर होतेच शिवाय शेतजमिनीचीही हानी होते. त्यावर उपाय म्हणून राज्य सरकारने या पाचटापासून कृषी खात्याच्या साह्याने सेंद्रिय खत तयार करण्याचा उपक्रम जाहीर केला आहे. शेतकऱ्यांना जागृत करण्याची जबाबदारी कृषी खात्यावर देण्यात आली आहे.
पुण्याचे जिल्हा कृषी अधीक्षक ज्ञानेश्वर बोटे यांनी सांगितले की, जिल्ह्यातील उसाचे क्षेत्र १ लाख ३० हजार हेक्टर आहे. त्यातील ४० हजार हेक्टरवर यंदा हा प्रयोग करणार आहोत. पाचट जाळू नये, असे आवाहन शेतकऱ्यांना करण्यात येत आहे. कारखान्यांकडून मदत मिळवण्यासाठीही प्रयत्नशील आहोत.
एक हेक्टरमधून साधारण ८ ते १० टन पाचट मिळते. त्यातून ५ टन सेंद्रिय खत तयार होईल. या सेंद्रिय खतातील अन्नद्रव्ये बाहेरून विकत आणायची झाल्यास २० हजार ४६१ रुपये खर्च येतो. पाचटापासून हेच खत तयार करण्यासाठी खर्च प्रतिहेक्टर फक्त २ हजार १८३ रुपये खर्च येतो. हा खर्चही शेतकऱ्यांना करावा लागू नये यासाठी साखर कारखान्यांची मदत घेण्याची सूचना पवार यांनी केली आहे.