नम्रता फडणीसपुणे : आजवर छत्रपती शिवाजी महाराजांचे पोवाडे, शाहिरी कार्यक्रम अनेकदा ऐकले असतील, पण शिवाजी महाराजांचे चरित्र नव्या पिढीला समजून सांगण्यासाठी विद्यार्थ्यांचा एक वर्ग घेतला जात आहे आणि तोही महाविद्यालयीन स्तरावर, हे ऐकून काहीसा आश्चर्याचा धक्का बसेल! पण हो, गेल्या वर्षभरापासून सर परशुरामभाऊ महाविद्यालयामध्ये विद्यार्थ्यांच्या उत्स्फूर्त प्रतिसादात हा ‘शिवचरित्रा’चा क्लास रंगला आहे. युवापिढीमध्ये शिवरायांच्या जाज्वल्य इतिहासाची ज्योत प्रजल्वित करण्यासाठी अशाप्रकारचा वर्ग घेणारे ‘स. प.’ हे पहिले महाविद्यालय ठरले आहे. आजची परिस्थिती पाहिली तर ,छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंती आणि पुण्यतिथी आली की मोठेमोठे रेकॉर्ड लावून तरूणांकडून हुल्लडबाजी केली जाते किंवा शोभायात्रा काढल्या जातात अथवा हातात झेंडे घेऊन रस्त्यांवरून गाड्या फिरवत मिरविले जाते. मात्र शिवाजी महाराजांचे विचार, त्यांचे कार्य याचा ना कुणाकडून परामर्श घेतला जातो ना ते जाणून घेण्यासाठी युवापिढीकडून कोणत्या सकारात्मक हालचाली होतात. हा वर्ग म्हणजे तरूणांमध्ये शिवाजी महाराजांचा जाज्वल्य इतिहास जागृत करण्याबरोबरच ‘शिवाजी कोण होता’ हे सांगण्यासाठी उचललेले एक अभिनव पाऊल आहे. विद्यार्थ्यांच्या मनामध्ये 'शिवछत्रपतींच्या इतिहासाबद्दल' असलेली 'ओढ, आस्था आणि आदर' लक्षात घेऊन गेल्या वर्षभरापासून हा वर्ग सुरू करण्यात आला आहे. आठवड्यातून 'मंगळवार, गुरुवार, शनिवार' या ‘तीन’ वेळेमध्ये अर्धा तास छत्रपती शिवरायांचा इतिहास समजून सांगण्याचा प्रयत्न केला जातोय. या वर्गाला विज्ञान, वाणिज्य, कला या तिन्ही शाखांचे विद्यार्थी एकत्र बसतात आणि प्रत्येकाच्या दिवसाच्या वेळापत्रकानुसार 'महाविद्यालयीन शैक्षणिक तास बुडणार नाही' अशी वेळ निवडत शिवचरित्राच्या अभ्यासाचा हा ‘क्लास’ रंगतो. सुरूवातीच्या काही वर्गांची ख्याती ऐकल्यावर शिवचरित्र वर्गाला विद्यार्थ्यांचा चांगला प्रतिसाद मिळू लागला असल्याची माहिती स. प. प्राचार्य दिलीप शेठ यांनी ‘लोकमत’शी बोलताना दिली. या वर्गामध्ये शिवपूर्वकालीन महाराष्ट्र , शिवजन्म, शिवरायांचे बालपण आणि स्वराज्याची सुरवात या विषयांवर सौरभ कोर्डे हा युवक प्रभावीपणे व्याख्यान देत आहे आणि त्याला विद्यार्थ्यांची पसंती मिळत असल्याचे ते म्हणाले.‘तरुणांना म्हणजेच या देशाच्या भावी मावळ्यांना 'पूर्णत: शिवछत्रपती व त्यांचे अनेक पैलू समजावे यासाठी नेहमीच्या आक्रमक शैलीला मुरड घालत 'शिवरांयांचे प्रसंग-त्यांच्या युक्त्या, त्यांचे चातुर्य-वेगवेगळे गुण' पुन्हा पुन्हा अभ्यासून वर्गामध्ये मांडण्याचा प्रयत्न करीत आहे. शैक्षणिक वर्षाच्या अखेरीस 'शिवजयंतीला' मागच्या शिवचरित्र वर्गाची सांगता झाली. यावर्षीचा शिवचरित्र वर्ग सुरू झाला आहे. तरुण तरुणींच्या हृदयामध्ये शिवचरित्र भिनले तर मनाने व शरीराने भक्कम व मजबूत बनलेली ही पिढी भारतमातेची अनमोल संपत्ती असेल. त्यामुळे या वर्गाप्रमाणेच महाराष्ट्रातील इतर महाविद्यालयातील विद्यार्थ्यांनी स्वत:च्या महाविद्यालयामध्ये 'शिवचरित्र वर्ग' लवकरात लवकर सुरु करावा, ही एकच इच्छा आहे.- सौरभ कर्डे
प्रज्वलित होतेय शिवरायांच्या जाज्वल्य इतिहासाची ज्योत; स. प. महाविद्यालयात ‘शिवचरित्र वर्ग’
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 19, 2017 6:31 PM
गेल्या वर्षभरापासून सर परशुरामभाऊ महाविद्यालयामध्ये विद्यार्थ्यांच्या उत्स्फूर्त प्रतिसादात हा ‘शिवचरित्रा’चा क्लास रंगला आहे.
ठळक मुद्देअशाप्रकारचा वर्ग घेणारे ‘स. प.’ हे ठरले पहिले महाविद्यालय गेल्या वर्षभरापासून सुरू करण्यात आला वर्ग