पुणे : पेट्रोलियम उत्पादनांच्या संवर्धनास प्रोत्साहन देण्यासाठी भारत पेट्रोलियम कॉपोर्रेशनतर्फे (बीपीसीएल) सक्षम सायक्लोथॉन या सायकल रॅलीचे आयोजन करण्यात आले होते. खासदार अनिल शिरोळे यांनी हिरवा झेंडा दाखवून रॅलीला सुरुवात केली. त्यांनी ५ किलोमीटर सायकल रॅलीमध्ये सहभागी होत पुुणेकरांना सायकल वापरा...इंधन वाचवा हा संदेश दिला.
पेट्रोलियम कन्झर्वेशन अँड रिसर्च असोसिएशन (पीसीआरए), आयओसीएल आणि एचपीसीएल यांच्या सहयोगाने रॅलीचे आयोजन करण्यात आले होते.
गोळीबार मैदानापासून रॅलीला सुरुवात झाली. यावेळी एलपीजीचे कार्यकारी निर्देशक आर.पी. नाटेकर,महाप्रबंधक श्रीकांत यादवडकर, एलपीजीचे क्षेत्रीय प्रबंधक व्ही.एन. टिळक, एलपीजी महाराष्ट्र राज्यप्रमुख पी. के. सक्सेना, एलपीजी विभागाचे प्रादेशिक प्रबंधक संजय चौबे यावेळी उपस्थित होते.
अनिल शिरोळे म्हणाले, पेट्रोलियम आणि प्राकृतिक गॅस मंत्रालयाच्या इंधन वाचवा या उपक्रमाचे अनुसरण करुन पुणे शहर प्रदूषण मुक्त ठेवण्यासाठी सायकलचा वापर जास्तीत जास्त करायला हवा. आज दिल्ली, मुंबई यांसारख्या शहरांना प्रदूषणाने ग्रासले आहे. पुण्यामध्ये देखील मास्क लावून फिरण्याची वेळ येऊ नये यासाठी प्रदूषण आटोक्यात ठेवणे अतिशय गरजेचे आहे.
आर.पी. नाटेकर म्हणाले, आवश्यकतेनुसार इंधनाचा वापर करावा आणि पुणे शहर हरीत आणि प्रदूषणमुक्त ठेवावे यासाठी सक्षम सायक्लोथॉनचे आयोजन करण्यात आले आहे. प्रदूषण नियंत्रणात आणण्यासाठी किमान आठवड्यातून एक दिवस सायकलचा वापर, हा उपक्रम जनमानसात रुजायला हवा, असे त्यांनी सांगितले.
सायकल जनजागृती रॅलीला गोळीबार मैदानापासून सुरुवात होऊन पुढे महात्मा गांधी रोड, लष्कर पोलीस स्टेशनमार्गे पुन्हा गोळीबार मैदान येथे रॅलीचा समारोप झाला. भारतीय सायकल संघटना, पुणे आणि विविध सामाजिक संघटना या रॅलीमध्ये सहभागी झाले.