अवसरी : अवसरी बुद्रुक (ता. आंबेगाव) येथे बेकायदेशीरपणे बैलगाडा शर्यतीचे आयोजन केल्याबद्दल नऊ जणांच्या विरोधात मंचर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. बैलगाडा शर्यतीवर न्यायालयाची बंदी असतानादेखील बैलगाडा शर्यतीचे आयोजन केल्याचे मंचरपोलिसांनी सांगितले. आंबेगाव तालुक्याच्या पूर्व भागातील अवसरी बुद्रुक येथे शनिवारी( दि. २२) सकाळी साडेदहा वाजता बैलगाडा घाटात विनापरवाना काही लोक बैलगाड्या पळवत असल्याचे मंचर पोलीस ठाण्याचे सहायक फौजदार एस. डी. बरकडे, पोलीस कर्मचारी एस. बी. गिलबिले, एस. एस. गायकवाड, एस. आर. वाफगावकर, व्ही. बी. वाघ यांच्या निदर्शनास आले. पोलिसांनी तत्काळ हस्तक्षेप करून तेथील लोकांना सर्वोच्च न्यायालयाच्या निर्देशानुसार बैलगाडा शर्यतीस बंदी असून बैलगाडा शर्यत घेतल्यास कायदेशीर कारवाई होईल. असे वारंवार आदेश देऊनसुद्धा तेथील लोकांनी बैलगाडा शर्यत घेणे थांबवले नाही. लोकांनी बैलगाडा शर्यत चालू ठेवली. तेथे मोठा जनसमुदाय उपस्थित असल्याने कायदा व सुव्यस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये म्हणून बैलगाडा शर्यतीचे आयोजन करणारे किशोर कोंडीभाऊ हिंगे, संजय जयसिंग हिंगे, विनोद रमेश हिंगे, विजय विष्णू हिंगे, सुमित अनंता हिंगे, नितीन खंडेराव हिंगे, धनेश सुधाकर हिंगे, पवन लक्ष्मण हिले, राहुल आनंदराव हिंगे यांच्यावर मंचर पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. या घटनेचा तपास मंचर पोलीस ठाण्याचे पोलीस कर्मचारी सुनील शिंदे करत आहेत. बैलांना चढणीच्या रस्त्याने घाटात चढाला त्यांच्या क्षमतेपेक्षा व ताकतीपेक्षा जास्त पळवल्याने त्यांना यातना होईल अशाप्रकारे क्रूरतेने व निर्दयपणे वागवून त्यांना बैलगाड्याला जुंपून बैलगाड्यासह पळविणे तसेच शर्यतीचे आयोजन करुन बैलांचा छळ केला. म्हणून मंचर पोलीस ठाण्याचे पोलीस कर्मचारी सुदर्शन माताडे यांनी संबंधितांच्या विरोधात फिर्याद दिली.
आंबेगाव तालुक्यात बेकायदेशीरपणे बैलगाडा शर्यतीचे आयोजन
By ऑनलाइन लोकमत | Published: December 24, 2018 6:27 PM
बेकायदेशीरपणे बैलगाडा शर्यतीचे आयोजन केल्याबद्दल नऊ जणांच्या विरोधात मंचर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे
ठळक मुद्दे नऊ जणांच्या विरोधात मंचर पोलीस ठाण्यात गुन्हा