पुणे : जागतिक पर्यावरणदिनी (दि. ५) देशभरातील व्यंगचित्रकार एकत्र येऊन व्यंगचित्राच्या माध्यमातून जनजागृती करणार आहेत. याचाच एक भाग म्हणून दि. ४ ते ६ जूनदरम्यान महाराष्ट्र व्यंगचित्रकार ग्रुपच्या कार्टून्स कट्ट्यातर्फे ‘आमचे पर्यावरण’ हे ऑनलाइन व्यंगचित्र प्रदर्शन आयोजित करण्यात आले आहे. या कार्टून्स कट्ट्यातील व्यंगचित्रकार व्यंगचित्रशैलीतून पर्यावरणाविषयीचे वास्तव चित्र मांडणार असून, जनजागरही करणार आहेत.
या ऑनलाइन व्यंगचित्र प्रदर्शनात विनय चानेकर, घनश्याम देशमुख, सतीश आचार्य, श्रीनिवास प्रभुदेसाई, अनंत दराडे, राजीव गायकवाड आदी व्यंगचित्रकार सहभाग घेणार आहेत.
याविषयी कार्टून्स कट्ट्याचे संयोजक आणि व्यंगचित्रकार घनश्याम देशमुख म्हणाले की, कोरोनामुळे यावर्षी पर्यावरणदिनी प्रत्यक्षपणे व्यंगचित्र प्रदर्शन कलादालनांमध्ये आयोजित करणे शक्य नाही. त्यामुळे देशभरातील निवडक व्यंगचित्रकारांनी एकत्र येऊन हे ऑनलाइन चित्र प्रदर्शन आयोजिले आहे. ते व्यंगचित्रशैलीतून पर्यावरण याविषयावर व्यंगचित्रे रेखाटून पर्यावरणविषयक जनजागृती करणार आहेत. आमचे पर्यावरण या प्रदर्शनातून व्यंगचित्रकारांची चित्रे आणि स्लाइड शो सोशल मीडियावर राज्यभरात प्रसारित केले जाणार आहेत. कार्टून्स कट्टा या फेसबुक पेजवर ते विनामूल्य पाहायला मिळणार आहेत.