पुणे : सायना नेहवाल, सानिया मिर्झा, पी.व्ही सिंधू, श्रीकांत किदम्बी असे बॅडमिंटनपटू जागतिक स्तरावर भारताचं नाव उंचावत आहेत. पण तुम्हाला माहितेय का? बॅडमिंटन हा खेळ सर्वात आधी भारतात खेळला गेलाय. ब्रिटिशांनी पुण्यात हा खेळ खेळला. त्यानंतर ब्रिटिशांनी हा खेळ इग्लंडमध्ये नेला त्यानंतर खऱ्या अर्थानं बॅडमिंटनच्या प्रसिद्धिला सुरुवात झाली.
आणखी वाचा - ही आहेत पुण्यातील रोमँटीक स्थळं , तुम्ही इथे जाऊन आलात का ?
1870च्या दशकात ब्रिटिशांच्या सैनिकांनी पुण्यातील खडकी येथे अॅम्यूनेशन फॅक्टरीमध्ये पहिल्यांदा हा खेळ खेळला. या रॅकेट स्पोर्ट्सची सुरुवात पुण्यापासून झाल्याने या खेळाला सुरुवातील ‘पुना गेम’ म्हणून ओळखलं जायचं. पूर्वी पुण्याला पुना हे नाव होतं. या नावावरूनच पुना गेम असं या खेळाला नाव पडलं. ब्रिटिश त्यांच्या फावल्या वेळात हा खेळ खेळू लागले. सेवानिवृत्त झालेल्या ब्रिटिश अधिकाऱ्यांनी हा खेळ इंग्लडमध्येही खेळायला सुरुवात केली. या खेळाचे साहित्य पाहून तेथील एका स्थानिक खेळाचे साहित्य विकणाऱ्या व्यावसायिकाने बॅडमिंटनसारखाच दुसरा खेळ सुरू केला. मात्र तो खेळ खेळाडूंच्या पसंतीस आला नाही. दरम्यान, 1873 साली इंग्लडमधील ग्लॉसेस्टरशाईरच्या बॅडमिंटन हाऊसने हा खेळ अधिकृतरित्या जाहीर करण्यासाठी एका कार्यक्रमाचे आयोजन केले होते. याच कार्यक्रमात या खेळाला बॅडमिंटन असं नाव देण्यात आलं.
आणखी वाचा - पुण्यातील हे कॉफी शॉप खास बनवलंय बच्चेकंपनीसाठी
त्यानंतर भारतीय ब्रिटीशांनी या खेळाबाबत बनवलेल्या नियमांनुसारच हा खेळ खेळला जात असे. 1887 सालापर्यंत हे नियम वापरले जात होते. मात्र कालांतराने म्हणजेच 1889 साली बॅडमिंटन असोसिएशन ऑफ इंग्लडने नवे नियम लागू केले. खेळण्याचे नवे रेग्यूलेशन्सही तयार करण्यात आले. ते नियम आजतागायत पाळले जात आहेत. 1899 साली ऑल इंग्लंड ओपन बॅडमिंटन चॅम्पिअनशीप अशी जागतिक स्तरावरची पहिली स्पर्धा भरवण्यात आली. जागतिक स्तरावरचा हा खेळ पुण्यातून पहिल्यांदा खेळला गेला असला तरीही असा इतिहास कोणाकडून सांगितला जात नाही. एका आकडेवारीनुसार असं स्पष्ट होतंय की, बडमिंटनच्या राज्यस्तरीय स्पर्धा एकट्या पुण्यात जास्त प्रमाणात भरवल्या जातात. सुशांत चिपलकट्टी स्मरणार्थ बॅडमिंटन स्पर्धा, व्ही.व्ही रॅकिंग ऑल इंडिया रँकिंग, ओल्ड मॉन्क आणि हवेली तालुका, महाराष्ट्र बॅडमिंटन लिग अशा जवळपास 37 स्पर्धांचं आयोजन वर्षभरात पुण्यात केलं जातं. त्यामुळे राष्ट्रीय पातळीवर भरवण्यात येणाऱ्या बॅडमिंटन स्पर्धांमध्ये पुण्यातील स्पर्धकांचाच अधिक समावेश असतो.