पुणे : शहरात ‘झिका’ या विषाणूची लागण ४६ वर्षांच्या प्रॅक्टिसिंग डाॅक्टर आणि त्याच्या १५ वर्षांच्या मुलीला झाल्याचे आढळून आले. झिका (Zika Virus) हा प्रामुख्याने आफ्रिका आणि आग्नेय आशिया, अमेरिका व दक्षिण भारतात आढळताे. या डाॅक्टर व कुटुंबीयांनी या ठिकाणी किंवा दुसरीकडे प्रवास केला नव्हता. त्यामुळे त्यांना ‘झिका’ची लागण कशी झाली, हा प्रश्न अनुत्तरित आहे.
‘झिका’चा प्रसार एडिस इजिप्ती (Aedes Aegypti) डासांपासून माणसाला हाेताे. रुग्णांच्या लैंगिक संबंधातूनही त्याचा प्रसार हाेताे. याआधी पुण्यात जेव्हा-जेव्हा रुग्ण सापडले तेव्हा त्यांनी काेठे ना काेठे प्रवास केल्यामुळे किंवा संपर्कात आल्याने तेथे त्यांना लागण झाली होती. परंतु, आता सापडलेल्या रुग्णाच्या संसर्गाची साखळी मात्र आराेग्य यंत्रणेला सापडलेली नाही. संसर्गाचे मूळ शाेधले गेले नाही, तर हा संसर्ग इतरांनाही हाेऊ शकताे आणि त्याचे रुग्ण वाढू शकतात, अशीही भीती व्यक्त केली जात आहे.
काय आहे झिका?
झिका हा फ्लॅविव्हायरस वंशातील विषाणू आहे. युगांडाच्या (Uganda) झिका जंगलातून हा विषाणू प्रथम १९४७ मध्ये वेगळा करण्यात आला होता. त्यावरून त्याला ‘झिका’ हे नाव पडले आहे. सन १९५० च्या दशकापासून, आफ्रिकेपासून आशियापर्यंतच्या विषुववृत्तीय पट्ट्यात विषाणूचा प्रभाव आढळून येताे. २००७ ते २०१६ पर्यंत, हा विषाणू पूर्वेकडे, प्रशांत महासागर ओलांडून अमेरिकेपर्यंत पसरला.
लक्षणे काय?
याची लक्षणे डेंग्यूप्रमाणे असतात. त्यामध्ये ताप, अंगावर पुरळ उठणे, डाेळे येणे, सांधे व स्नायुदुखी, थकवा, डाेकेदुखी यांचा समावेश हाेताे. ही लक्षणे दोन ते सात दिवस राहतात. तसेच, सर्वसामान्य उपचार, विश्रांती हा यावर उपाय आहे. त्यामुळे मृत्यू हाेण्याचे प्रमाण नगण्य आहे.
गर्भवतींना धाेका
प्रौढांमध्ये झिका संसर्ग झाला तरी त्याचा दुष्परिणाम हाेत नाही; परंतु, गर्भवतीला झिकाचा संसर्ग झाला तर ताे संसर्ग त्यांच्या पाेटातील बाळापर्यंत पसरू शकतो. त्यामुळे मुदतपूर्व प्रसूती, बाळाच्या डाेक्याचा घेर कमी हाेणे, मायक्रोसेफली, मेंदूतील गंभीर विकृती आणि इतर जन्मदोष होऊ शकतात.
आता आढळलेल्या रुग्णांचा संसर्गाचा साेर्स सापडलेला नाही. झिका हा तुरळक दिसणारा व काेविड किंवा स्वाइन फ्लूसारखा वेगाने पसरणारा नाही. रुग्णांच्या घरापासून आजूबाजूच्या १०० फुटांपर्यंत रुग्णांचे सर्वेक्षण करणे आणि डासांवर नियंत्रण ठेवले की ताे आटाेक्यात येताे. तशा उपाययाेजना केल्या आहेत. - डाॅ. राजेश दिघे, सहायक आराेग्याधिकारी, पुणे मनपा