पुणे : दिव्यांच्या सोनेरी तेजाने उजळलेला शनिवारवाडा आणि अतिशय सुंदर नृत्याविष्काराने प्रकाशपर्वाचे स्वागत करणारे कलाकार या चैतन्यमय वातावरणात तिमिरातून तेजाकडे जाण्यासाठी चिमुकल्यांनी दीपप्रार्थना केली. निमित्त होते विधायक पुणेतर्फे आयोजित दीपप्रार्थनेचे. समाजातील अनाथ आणि वंचित मुलांसाठी शनिवारवाड्याच्या प्रांगणात रविवारी सायंकाळी हा उपक्रम राबविण्यात आला. ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्त्या प्रतिभा शाहू मोडक, दिलीप काळोखे, किशोर आदमणे, गिरीश सरदेशपांडे, पीयूष शहा, योगिनी पाळंदे, प्रा. संगीता मावळे आदी उपस्थित होते. दिव्यांच्या प्रकाशात अनाथ आणि वंचित मुलांचे दु:ख, वेदना दूर होऊन उत्साह-आनंदाचा तेजस्वी प्रकाश त्यांच्या आयुष्यात यावा, यासाठी दीपप्रार्थनेचे आयोजन करण्यात येते. दगडखाण कामगारांच्या मुलांसाठी काम करणारी संतुलन पाषाण, अनाथ मुलांचे हक्काचे आपलं घर, सह्याद्री मेडिकल अॅण्ड एज्युकेशनल ट्रस्टमधील पोतराजांची मुले, रस्त्यावरील मुलांसाठी काम करणाऱ्या रेनबो फाउंडेशनमधील ४०० ते ५०० मुलांना दिवाळीनिमित्त कपडे, फराळ आणि खाऊ देण्यात आला. या वेळी लख लख चंदेरी या गीतावर वृंदा साठे व कलाकारांनी दीपनृत्य सादरीकरण केले. आनंद सराफ यांनी सूत्रसंचालन केले. (प्रतिनिधी)
अनाथ-वंचितांचा दीपोत्सव
By admin | Published: October 24, 2016 1:36 AM