अनाथ उमेदवारांना डावलले; मुलाखतीला बोलावलेच नाही पुणे : राज्यात भाजपचे सरकार असताना अनाथांना स्पर्धा परीक्षेत समांतर १ टक्का आरक्षण देण्यात आले. परंतु, त्याची अंमलबजावणी मात्र अद्याप होताना दिसून येत नाही. नुकताच महाराष्ट्र लोकसेवा आयोगाचा निकाल जाहीर झाला. त्यात अनाथांना मुलाखतीला न बोलावताच त्यांची एक जागा खुल्या गटातील उमेदवाराला दिली आहे. त्यामुळे अनाथ अधिकारी होण्यापासून वंचित राहिले आहेत, असा आरोप स्पर्धा परीक्षेचा अभ्यास करणारी आणि अनाथांसाठी लढणारी अमृता करवंदे हिने केला आहे. गेल्या अनेक वर्षांपासून स्पर्धा परीक्षेत अनाथ उमेदवार उत्तीर्ण होऊनही त्यांना अधिकारी होता आले नाही. कारण अनाथ असल्याने त्यांच्याकडे रहिवासी प्रमाणपत्र नव्हते. या प्रश्नावर अमृता करवंदे हिने सतत लढा दिला. त्यानंतर तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अनाथांसाठी समांतर १ टक्का आरक्षण जाहीर केले. त्यामुळे अनाथांना दिलासा मिळाला होता. पण दोन वर्षे झाली तरी मुख्य परीक्षेत चांगल्या गुणांनी उत्तीर्ण होऊनही अनाथ उमेदवारांना मुलाखतीला बोलावले जात नाही. त्यामुळे त्यांची जागा रिक्त दाखवून ती जागा खुल्या गटातील उमेदवाराला दिली जात आहे. याविषयी अमृता करवंदे म्हणाली,‘‘आम्ही सतत आरक्षणाची अंमलबजावणी व्हावी म्हणून प्रयत्न करतोय. मंत्रालयात फेऱ्या मारतोय. परंतु, एमपीएससीकडून दखल घेतली जात नाही. मंत्रालयात मार्च २०२० मध्ये उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासोबत बैठक झाली होती. तेव्हा त्यांनी आयोगाला योग्य कार्यवाहीचे आदेश दिले. त्यानंतरही या वेळी निकालात अनाथांना ठेंगाच दिला आहे.’’ =======================...मंत्रालयासमोर उपोषणच करणार ! राज्यात अनाथ प्रमाणपत्र घेतलेले १०४ जण आहेत. त्यातील फक्त १० ते १५ जण पदवीधर आणि स्पर्धा परीक्षेचा अभ्यास करतात. आम्ही या वेळी परीक्षा दिली. मुख्य परीक्षेपर्यंत माझ्यासह काही उमेदवार गेले. पण मुलाखतीसाठी आम्हाला बोलावलेच नाही. हा आमच्यावर अन्याय केला जात आहे. सतत मंत्रालयात जाणे परवडत नाही. आता तिथे जाऊन उपोषण करण्याशिवाय पर्यायच राहिला नाही. - अमृता करवंदे, अनाथांसाठी काम करणारी आणि स्पर्धा परीक्षेची विद्यार्थिनी =====================
'एमपीएससी'त अनाथांची जागा खुल्या गटाला, मंत्रालयासमोर उपोषण करणार
By ऑनलाइन लोकमत | Published: June 22, 2020 12:00 PM
भाजप सरकार राज्यात सत्तेत असताना त्यांनी अनाथांना स्पर्धा परीक्षेत समांतर एक टक्का आरक्षण देण्यात आले होते...
ठळक मुद्देअनाथ उमेदवारांना डावलले, मुलाखतीला बोलावेलच नाही..