पुणे : मराठी चित्रपट जागतिक स्तरावर पोहोचविण्यासाठी सरकारने पावली उचलली असून, चित्रपटाच्या संवर्धनासाठी ऑस्कर अकादमीच्या सुविधा व योजना यांचा प्रभावीपणे वापर करून घेण्याकरिता राज्यस्तरावर समिती स्थापन करण्यात आली आहे. मात्र, आचारसंहिता लागू झाल्याने नवीन सरकार स्थापनेनंतरच या समितीची पहिली बैठक होईल. याचा अध्यादेश नुकताच काढला आहे. ऑस्कर अकादमीचे सदस्य डॉ. उज्ज्वल निरगुडकर यांना जगभरामध्ये सर्वाधिक मानाच्या समजला जाणाऱ्या ९१व्या ऑस्कर पुरस्कार सोहळ्यामध्ये भारताचे प्रतिनिधी म्हणून आमंत्रित करण्यात आले होते. ऑस्कर अकादमीचा भारतीय चित्रपटांसह मराठी चित्रपटांना कशा पद्धतीने फायदा करून घेता येऊ शकतो, यादृष्टीने निरगुडकर सातत्याने प्रयत्न करीत आहेत. याच प्रयत्नांचा एक भाग म्हणून ऑस्कर अकादमीचे अध्यक्ष जॉन बेली यांनी मुंबईला भेट दिली आणि महाराष्ट्र राज्य चित्रपट पुरस्कार सोहळ्याला आवर्जून हजेरी लावली होती. मराठी चित्रपटांचे संवर्धन आणि मराठी चित्रपट जगाच्या कानाकोपºयात पसरावा, यासाठी ऑस्कर अकादमी सहकार्य करण्यास तयार आहे. अकादमीच्या सुविधा व योजनांचा प्रभावीपणे वापर करून घेण्यासाठी राज्यस्तरावर समिती स्थापन करण्याचा निर्णय भेटीदरम्यान घेण्यात आला होता. या निर्णयाच्या अनुषंगाने विधानसभा निवडणुकीची आचारसंहिता लागू होण्यापूर्वी ही समिती स्थापन केली. या समितीचे अध्यक्ष राज्याचे सांस्कृतिक मंत्री असतील. तर, सांस्कृतिक कार्याचे प्रधान सचिव हे सदस्य व व्यवस्थापकीय संचालक, महाराष्ट्र चित्रपट रंगभूमी आणि सांस्कृतिक विकास महामंडळ मर्यादित हे सदस्य असतील. उज्ज्वल निरगुडकर यांचा तज्ज्ञ म्हणून समितीत समावेश आहे........
दादासाहेब फाळकेंचा पुतळा असेल.. ऑस्कर अकादमीचे विभागीय कार्यालय मुंबईत करण्यासाठी योजना व पाठपुरावा करणे. चित्रपट इतिहासावर आधारित आंतरराष्ट्रीय संग्रहालय बांधण्याचे काम अकादमीतर्फे लॉस एंजलीस (अमेरिका) येथे चालू आहे.
भारतीय चित्रपटसृष्टीचे प्रणेते दादासाहेब फाळके यांचा अर्धाकृती पुतळा या संग्रहालयात असावा, हे अकादमीने मान्य केले आहे. नवीन सरकार आल्यानंतर समितीची बैठक घेऊन कामाची आखणी केली जाणार असल्याचे सूत्रांकडून सांगण्यात आले आले.