पुणे : कोरेगाव पार्क येथील ओशो आश्रमाच्या प्रवेशद्वारावर जमाव करून आश्रम व्यवस्थापनाविरूद्ध घोषणाबाजी केली गेली. तसेच आश्रमात प्रवेश करण्याचा प्रयत्न केला. याप्रकरणी कोरेगाव पार्क पोलिसांनी १०० ते १२० अनुयायांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.
याबाबत ओशो आश्रम व्यवस्थापनाकडून धनेशकुमार रामकुमार जोशी तथा स्वामी ध्यानेश भारती (वय ६५, रा. कोरेगाव पार्क) यांनी फिर्याद दिली. त्यानुसार पोलिसांनी प्रमोद त्रिपाठी तथा प्रेम पारस, सुनील मिरपुरी तथा स्वामी चैतन्य कीर्ती, गोपाल दत्त भारती तथा स्वामी गोपाल भारती, राजेश वाधवा तथा स्वामी धान अनुग्रह, किशोर लाभशंकर रावल तथा स्वामी प्रेम अनादी, जगदीश शर्मा तथा स्वामी अमन विस्मय, आरी राजदान तथा कुनिका भट्टी तसेच फोटोग्राफर वैभवकुमार पाठक यांच्यासह सुमारे १२० जणांविरूद्ध गुन्हा दाखल केला आहे.
ओशो आश्रमात प्रवेश देण्यास व्यवस्थापनाने नकार दिल्याने अनुयायांनी प्रवेशद्वारासमोर घोषणाबाजी केली होती. बेकायदा प्रवेश करण्याचा प्रयत्न करण्यात आला. ट्रस्टच्या सदस्य साधना (वय ८०) यांना धक्काबुक्की केली. तसेच फोटोग्राफर वैभवकुमार पाठक यांनी पत्रकार असल्याचे सांगून आश्रमात बेकायदा प्रवेश करण्याचा प्रयत्न केला. अनुयायांनी जोशी यांना धक्काबुक्की केल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. पोलिस उपनिरीक्षक सावंत तपास करत आहेत.